काँग्रेस नगरसेविकेविरुद्ध खंडणीचा गुन्हा ; महिलेला मारहाण करत अपहरण केल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 08:15 IST2026-05-18T08:14:50+5:302026-05-18T08:15:03+5:30
आशा कोपरकर या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कोपरकर यांच्या पत्नी आहेत. महिलेच्या तक्रारीनुसार, त्यांची ओळख २०२० मध्ये सामाजिक आणि निवडणूक प्रचाराच्या कामादरम्यान सुरेश कोपरकर यांच्याशी झाली होती.

काँग्रेस नगरसेविकेविरुद्ध खंडणीचा गुन्हा ; महिलेला मारहाण करत अपहरण केल्याचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भांडुप पश्चिम येथील रहिवासी आणि फॅशन डिझायनर असलेल्या ५६ वर्षीय महिलेने काँग्रेस नगरसेविका आशा कोपरकर व त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध खंडणी, मारहाण, अपहरण, शिवीगाळ, धमकी आणि मालमत्ता बळकावण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर तक्रार भांडुप पोलिसांत दिली आहे. त्यानुसार, आशा कोपरकर, त्यांच्या दोन मुली, जावई, मुलगा आणि त्यांचा चालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
आशा कोपरकर या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कोपरकर यांच्या पत्नी आहेत. महिलेच्या तक्रारीनुसार, त्यांची ओळख २०२० मध्ये सामाजिक आणि निवडणूक प्रचाराच्या कामादरम्यान सुरेश कोपरकर यांच्याशी झाली होती. कोरोनाकाळात विविध सामाजिक उपक्रमांमुळे दोघांमध्ये संपर्क वाढला. मात्र, नंतर कोपरकर कुटुंबीयांकडून त्यांच्या संबंधांबाबत संशय घेत वारंवार वाद निर्माण
घातल्याचा आरोप
करण्यात आला.
महिलेने दिलेल्या माहितीनुसार, ५ मे रोजी दुपारी कोपरकर कुटुंबातील काही सदस्य व त्यांच्या सहकाऱ्यांनी भांडुप येथील तिच्या घराबाहेर येऊन शिवीगाळ केली. त्यानंतर तिला जबरदस्तीने एका कार्यालयात नेण्यात आले. तेथे तिच्यासह तिच्या परिचित महिलेला धमकावून मारहाण केल्याचा आरोप आहे. तिच्या मुलींनाही अश्लील भाषेत अपमानित केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
‘तुझे हातपाय तोडू,
धंदा बंद करू’
आरोपींनी ‘तुझे हातपाय तोडू’, ’धंदा बंद करू’ अशा धमक्या दिल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. ११ मे रोजी कर्जत येथील तिच्या ‘जया व्हिला’ या मालमत्तेचे नुकसान करण्यात आल्याची माहिती तिला मिळाली.
१२ मे रोजी तिची कार जबरदस्तीने कार्यालयात जमा करून घेण्यात आली. कार हस्तांतरणाच्या कागदपत्रांवर सही करण्यासाठी दबाव टाकल्याचाही आरोप आहे.
१४ मे रोजी रसल फर्नांडिस याला त्याच्या कामाच्या ठिकाणावरून जबरदस्तीने उचलून कार्यालयात नेऊन चौकशी व धमकी दिली. तक्रारदाराच्या मालमत्ता आरोपींच्या सांगण्याप्रमाणे हस्तांतरित न केल्यास पुन्हा घरात येऊन गोंधळ घालण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे.