३० तासांच्या कोंडीची समितीकडून चौकशी; एक्स्प्रेस वे मिसिंग लिंक मे महिन्यात वाहतुकीस खुला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 07:10 IST2026-03-26T07:09:50+5:302026-03-26T07:10:48+5:30
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील लोणावळा घाटातील वाहतूककोंडीवर ‘मिसिंग लिंक’ हा कायमस्वरूपी तोडगा ठरणार आहे.

३० तासांच्या कोंडीची समितीकडून चौकशी; एक्स्प्रेस वे मिसिंग लिंक मे महिन्यात वाहतुकीस खुला
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील लोणावळा घाटातील वाहतूककोंडीवर ‘मिसिंग लिंक’ हा कायमस्वरूपी तोडगा ठरणार आहे. या प्रकल्पाचे ९७.७ टक्के काम पूर्ण झाले आहे. मे २०२६ पासून हा मार्ग सर्वसामान्यांसाठी खुला करण्याचे नियोजन आहे. या नवीन मार्गिकेमुळे घाटातील धोकादायक वळणे कमी होतील आणि अपघातांच्या संख्येत मोठी घट होईल, असा विश्वास मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला. सभागृहात नियम २९३ अंतर्गत मांडलेल्या प्रस्तावावर उत्तर देताना भुसे यांनी ही माहिती दिली.
मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर फेब्रुवारी महिन्यात झालेल्या वायू गळतीमुळे तब्बल ३० तास वाहतूक ठप्प होण्याच्या घटनेची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे.
महामार्गांवर नवीन सुरक्षा नियमावली लागू करणार
भविष्यात अशा आपत्कालीन स्थितीत महामार्ग पूर्णपणे बंद पडू नये आणि वाहतूककोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना सुचवण्यासाठी आयआरसीचे माजी अध्यक्ष सी. पी. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय तज्ज्ञ समितीची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहितीही भुसे यांनी विधानसभेत दिली. एक्स्प्रेस वे वरील ३० तासांच्या त्या भीषण कोंडीमुळे प्रवाशांचे झालेले हाल आणि यंत्रणेवर आलेला ताण पाहता, भविष्यातील नियोजनासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती अशा घटनांनंतर वाहतूक वळवण्याचे पर्यायी मार्ग आणि तातडीच्या उपाययोजनांचा अहवाल सादर करणार आहे. या अहवालानुसार महामार्गावर नवीन सुरक्षा नियमावली लागू केली जाईल, असे मंत्र्यांनी स्पष्ट केले.