Join us
Daily Top 2Weekly Top 5

"बाळासाहेब ठाकरे यांनी ३० वर्षांपूर्वी औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलं; आता फक्त..."

By मुकेश चव्हाण | Updated: January 4, 2021 10:54 IST

औरंगाबादच्या नामांतराविषयीची शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. 

मुंबई / औरंगाबाद : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असे करण्याच्या मुद्द्यावर राजकीय कलगीतुरा सुरूच आहे. औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मात्र, गेल्या 5 वर्षे शिवसेना सत्तेत असतानाही आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून शिवसेना पक्षप्रमुख हेच राज्याचे मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचे संभाजीनगर झालं नसल्यानं भाजपा, मनसे यांच्याकडून टीका करण्यात येत आहे. मात्र याचदरम्यान शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी महत्वाचं विधान केलं आहे. 

औरंगाबादचे नाव बदलण्यासाठी हलचाली सुरू असल्याचे वृत्त माध्यमांत झळकले. त्यानंतर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी, आमचा त्यास विरोध असल्याचं ठामपणे सांगितलं. त्यामुळे विरोधी पक्षांनी शिवसेनेला कोंडीत पकडण्याची सुरुवात केली आहे. मात्र संजय राऊत यांनी आज माध्यमांसोबत संवाद साधताना औरंगाबादच्या नामांतराविषयीची शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. 

औरंगाबादच्या नामांतराविषयीची शिवसेनेची भूमिका सर्वांना माहीत आहे. ३० वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचं नाव संभाजीनगर असं केलं आहे. त्यामुळे त्यावर आता फक्त सही शिक्का उमटायचा आहे, असं संजय राऊत यांनी सांगितले. 

काँग्रेसची भूमिका स्पष्ट

महाविकास आघाडीत काँग्रेस म्हणून आम्ही घटक पक्ष आहे, पण नामांतराला आमचा विरोध राहिल, असे थोरात यांनी स्पष्टपणे सांगितलंय. महाविकास आघाडीमध्ये कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरलेला आहे, त्यामुळे जेव्हा नाव बदलासंदर्भात प्रस्ताव येईल, तेव्हा आमचा विरोध राहिल. पण, अद्याप तसा कुठलाही प्रस्ताव समोर नसल्याचंही थोरात यांनी स्पष्ट केलंय. आम्हाला सत्तासुद्धा दुय्यम ठरते, राज्यघटनेची शपथ घेऊन आम्ही सत्तेत आलोय. त्यामुळे, त्या शपथेची प्रताडना होईल, अशी कुठलीही गोष्ट आम्हाला मान्य होणार नाही. महाविकास आघाडीही त्याचा आधारावर निर्माण झालेली आहे. सामाजिक मतभेदाला आमच्याकडे स्थान नाही, असे म्हणत संभाजीनगर या नामांतरणाला आमचा विरोध राहिल, असे बाळासाहेब थोरात यांनी ठामपणे सांगितलं आहे. 

महाविकास आघाडीमध्ये नामांतरावरून कोणतेही मतभेद नाहीत- राऊत

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी "महाविकास आघाडीमध्ये नामांतरावरून कोणतेही मतभेद नाहीत, असं सांगितलं आहे. बाळासाहेब थोरात असतील, अशोक चव्हाण किंवा अन्य कोणी महाराष्ट्रातील नेते आहेत त्यांचं औरंगजेबापेक्षा छत्रपती संभाजी राजे यांच्यावरच प्रेम आणि श्रद्धा आहे. प्रत्येक व्यक्तीची, हिंदूंची छत्रपती संभाजी महाराजांवर श्रद्धा असायला हवी. जसा बाबर आमचा कोणी लागत नाही तसा औरंगजेबही लागत नाही. दिल्लीतील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी राम मंदिर उभारण्याची परवानगी दिली आहे. कारण, या भूमीचं जसं बाबरशी नातं नाही तसंच औरंगजेबाशीही नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते एकत्र बसून यासंदर्भात चर्चा करुन निर्णय घेतील, असेही संजय राऊत यांनी सांगितलं.

टॅग्स :संजय राऊतबाळासाहेब ठाकरेशिवसेनाभाजपाऔरंगाबादकाँग्रेसमहाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकार