"लाल किल्लाही आज भयग्रस्त व अस्वस्थ असेल"; मोदींच्या भाषणावर शिवसेनेचा बाण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 09:03 AM2023-08-17T09:03:59+5:302023-08-17T09:05:30+5:30

सध्या पंतप्रधान आणि गृहमंत्रीएकाचराज्याचे आहेत. याआधी पंतप्रधान व भाजप अध्यक्ष हे एकाच राज्याचे होते

"Even the Red Fort will be fearful and restless today"; Shiv Sena's arrow on Modi's speech by Uddhav Thackeray | "लाल किल्लाही आज भयग्रस्त व अस्वस्थ असेल"; मोदींच्या भाषणावर शिवसेनेचा बाण

"लाल किल्लाही आज भयग्रस्त व अस्वस्थ असेल"; मोदींच्या भाषणावर शिवसेनेचा बाण

googlenewsNext

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन देशवासीयांना संबोधित करताना घराणेशाही, भ्रष्टाचार आणि तुष्टीकरण या तीन गोष्टींचा उल्लेख करत विरोधकांवर टीका केली. मोदींनी १५ ऑगस्टच्या भाषणात काँग्रेसचे नाव न घेता काँग्रेसवर निशाणा साधला. तसेच, पुढच्यावर्षीही झेंडा फडकवण्याची संधी आपल्यालाच मिळेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त केला. मोदींच्या भाषणानंतर काँग्रेस नेत्यांनीही त्यांच्यावर पलटवार केला. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंनी, ते पुढच्यावर्षी स्वत:च्या घरी झेंडा फडकवतील, असा टोलाही लगावला. आता, शिवसेनेकडूनही मोदींच्या भाषणावर निशाणा साधण्यात आला आहे. 

सध्या पंतप्रधान आणि गृहमंत्रीएकाचराज्याचे आहेत. याआधी पंतप्रधान व भाजप अध्यक्ष हे एकाच राज्याचे होते. सर्वसूत्रे व अंमलबजावणीचे अधिकार आपल्याच हाती असावेत याच 'उदात्त' हेतूने हे सर्व सुरू आहे. हे घराणेशाहीचेच रूप आहे, असे म्हणत शिवसेनेच्या मुखपत्रातून मोदींच्या घराणेशाहीवरील टिकेला प्रत्युत्तर देण्यात आलंय. तसेच, देशातील न्याययंत्रणा, निवडणूक आयोग, तपास यंत्रणा, राष्ट्रपती वगैरे घटनात्मक संस्था आज दहशतीच्या टाचेखाली आहेत. घराणेशाहीचे राज्य असताना लोक इतके भयग्रस्त कधीच नव्हते. आज लाल किल्लाही भयग्रस्त व अस्वस्थ असेल. त्यामुळे 'लाल किल्ल्यावरून मोदी यांचे हे शेवटचे भाषण आहे' ही लालू यादवांची भविष्यवाणी ही १४० कोटी लोकांची, स्वातंत्र्य संग्रामातील शहीद आत्म्यांची शापवाणी ठरू शकेल, अशा शब्दात शिवसेनेनं मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणानंतर परखड मत मांडलं आहे.  

लालूंच्या घरावर नव्या धाडी पडतील

देशाचा ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा झाला, पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून राष्ट्रीय संबोधन केले, त्यात नवे काय होते? तेच, तेच आणि तेच. मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीस दहा वर्षे होत आली व लाल किल्ल्यावरचे त्यांचे हे नववे भाषण. मोदी व शहांनी घेतल्याच तर देश सार्वत्रिक निवडणुकांना सामोरा जाईल. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू यादव यांनी स्वातंत्र्यदिनाच्या सोहळय़ात सांगितले की, 'लाल किल्ल्यावरून मोदींचे हे शेवटचे भाषण आहे. 'लालू यादव जे बोलले ते खरे ठरो, लालू यादवांच्या तोंडात साखर पडो अशा प्रकारच्या भावना देशाच्या गावागावांत आहेत. लाल किल्ल्यावर २०२४ चा तिरंगा मोदी फडकवणार नाहीत असे एकंदरीत वातावरण आहे. लालू यादव यांनी त्यांचे मत स्पष्टपणे मांडल्यामुळे त्यांच्या घरावर 'ईडी'च्या धाडी नव्याने पडू शकतील व एखाद्या खोटय़ा गुन्ह्यात अडकवून यादव कुटुंबाचा छळ केला जाईल, असे शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून म्हटलं आहे. 

१० वर्षात महान कार्य घडले काय?

मोदी यांनी जनतेला असे आश्वासन दिले की, 'मला पुन्हा एक संधी द्या. मी तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करेऩ' मात्र यापूर्वी 2014 आणि 2019 मध्ये दिलेल्या आश्वासनांचे व जनतेला दाखविलेल्या स्वप्नांचे काय झाले? ते आधी सांगा. पंतप्रधान मोदी 90 कोटी लोकांना फुकट रेशन देतात. त्या फुकट रेशनसाठी जनता भिकेचा कटोरा घेऊन रांगेत व रांगत उभी राहते. हेच विकास आणि प्रगतीचे लक्षण मानायचे काय? लोकांना असे पंगू करणे हे स्वातंत्र्य नाही. पंतप्रधान येतात आणि जातात, पण मोदी यांना मिळालेला दहा वर्षांचा काळ हा निंदानालस्ती, विरोधकांना त्रास देण्यासाठी नवनवीन क्लृप्त्या शोधणे व अमलात आणणे यातच गेला. पंडित नेहरू, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री, राजीव गांधी, नरसिंह राव, अटलबिहारी वाजपेयी हे आपला ठसा उमटवून गेले. अनेक नेत्यांना मोदी यांच्या तुलनेत कमी कालखंड मिळाला, पण या सर्व नेत्यांचे राजकीय कर्तृत्व सरस होते. मोदी यांना साधारण दहा वर्षांचा प्रदीर्घ कालखंड मिळाला, पण त्यांच्या हातून कोणतेही महान कार्य खरेच घडले काय ते शोधावे लागेल. राजकीय विरोधकांच्या टिंगलटवाळय़ा करण्यातच त्यांनी वेळ घालवला. या वेळी मोदी यांनी मणिपूरच्या हिंसाचाराचा उल्लेख लाल किल्ल्यावरील भाषणात केला.

मोदींनी देवेंद्र फडणवीसांकडून शिकावे

मणिपुरात लवकरच शांतता प्रस्थापित होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला, पण मणिपूरच्या प्रश्नावर संसदेत विरोधक प्रश्न विचारत होते तेव्हा मणिपूरवर भूमिका मांडण्यासाठी पंतप्रधान मोदी संसदेत फिरकले नाहीत. मोदींना मणिपूरवर बोलते करण्यासाठी संसदेत अविश्वास ठराव मांडावा लागला. मोदी मणिपूरसारख्या संवेदनशील विषयावर नाइलाज म्हणून लाल किल्ल्यावरून बोलले. ते बोलले नसते तर पुन्हा त्यांच्यावर हल्ले झाले असते. मोदी हे लोकशाही व संसदीय परंपरा मानायला तयार नाहीत, पण देशाच्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर जाऊन तिरंगा फडकवतात. कारण त्यांच्यासाठी तो एक 'इव्हेन्ट' ठरतो. मंगळवारच्या लाल किल्ल्यावरील भाषणात ''मी पुन्हा येईन व २०२४ ला मीच तिरंगा फडकवेन'' असे मोदींनी जाहीर केले. हा त्यांचा अहंकार आहे. ''पुन्हा येईन'' सांगणाऱ्यांची पुढे काय हालत होते ते त्यांनी महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांकडे पाहून शिकायला हवे.

Web Title: "Even the Red Fort will be fearful and restless today"; Shiv Sena's arrow on Modi's speech by Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.