आग लागलेल्या काचेच्या सेंटरचे वीज-पाणी तोडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 09:52 IST2025-10-25T09:52:08+5:302025-10-25T09:52:54+5:30
केवळ दोन वर्षांपूर्वी बांधलेल्या या इमारतीत अग्निशमन यंत्रणा बंद स्थितीत असल्याचे आढळले.

आग लागलेल्या काचेच्या सेंटरचे वीज-पाणी तोडले
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : जोगेश्वरी (प.) येथील जेएमएस बिझनेस सेंटरमध्ये गुरुवारी लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. महापालिकेच्या माहितीनुसार, प्राथमिक चौकशीत इमारतीला अद्याप ऑक्युपेशन सर्टिफिकेट (ओसी) मिळालेले नव्हते, तरीही इमारतीत व्यावसायिक कार्यालये कार्यरत असल्याचे उघड झाले आहे.
केवळ दोन वर्षांपूर्वी बांधलेल्या या इमारतीत अग्निशमन यंत्रणा बंद स्थितीत असल्याचे आढळले. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून तत्काळ कारवाई करत संपूर्ण इमारतीचे वीज व पाणीपुरवठा तोडण्यात आला आहे. विकासकाला नोटीसदेखील देण्यात येणार आहे.
जोगेश्वरीतील आगीत इमारतीच्या तीन मजल्यांवरील अंदाजे १५ ते २० कार्यालये पूर्णतः जळून खाक झाली. या प्रकरणात पालिकेच्या बिल्डिंग प्रपोजल विभाग व डीपी विभागाकडूनही स्वतंत्र कारवाई केली जाणार आहे. पालिकेच्या नियमानुसार एनओसी न घेता वापर सुरू केल्याबद्दल विकासावर प्रति चौरस मीटर १०० रुपये दंड ठोठावला जाणार आहे, तसेच व्यवसाय पुन्हा सुरू करण्यापूर्वी संपूर्ण इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
ओसी नसतानाही इमारतीत थाटली होती कार्यालये
जोगेश्वरीतील या घटनेमुळे बांधकाम सुरक्षितता, ओसीशिवाय सुरू असलेल्या इमारतीतील व्यवसायांवर कारवाई आणि त्यातील आग प्रतिबंधक प्रणालींच्या देखभालीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुंबईत आगीच्या वाढत्या घटनांमुळे मोठ्या प्रमाणात जीवित-मालमत्तेची हानी होत आहे.
आगीच्या सुमारे ९० टक्के घटना शॉर्ट सर्किटमुळे होतात, त्यामध्ये निकृष्ट दर्जाचे वायरिंग ही मुख्य कारणीभूत ठरते. दुसऱ्या क्रमांकावर घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरमुळे लागणाऱ्या आगी आहेत. मुंबईत गेल्या दोन वर्षांत सुमारे २०० आगीच्या घटना फटाक्यांमुळे झाल्याचे ही अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले आहे.