Dasara Melava Update: शिवसैनिक जल्लोषात असताना मोठा ट्विस्ट; शिवाजी पार्कासाठी शिंदे गट सुप्रीम कोर्टात जाणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 17:58 IST2022-09-23T17:56:44+5:302022-09-23T17:58:48+5:30
Dasara Melava Update: शिवसैनिकांनी एकच जल्लोष करण्यास सुरुवात केली असून, हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात शिंदे गट सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.

Dasara Melava Update: शिवसैनिक जल्लोषात असताना मोठा ट्विस्ट; शिवाजी पार्कासाठी शिंदे गट सुप्रीम कोर्टात जाणार!
Maharashtra Politics: शिवाजी पार्कवर नेमका कुणाचा दसरा मेळावा होणार यावरुन सुरू असलेल्या चर्चांना मुंबई उच्च न्यायालयाने पूर्णविराम दिला आहे. उद्धव ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्या घेण्याची परवनागी दिली असून, आता उद्धव ठाकरेंचीच तोफ शिवतीर्थावर धडाडणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. यानंतर राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये जल्लोषाचे वातावरण असतानाच आता शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दसरा मेळाव्यासाठी शिवाजीपार्क मैदान देण्याच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यात ठाकरे गट, शिंदे गट आणि पालिकेच्या वतीने युक्तीवाद करण्यात आला. सर्व पक्षांच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने ठाकरे गटाला दसरा मेळाव्यासाठी शिवाजीपार्कवर परवानगी दिली. यावेळी उच्च न्यायालयाने सदा सरवणकर यांची हस्तक्षेप याचिका फेटाळली. यानंतर शिंदे गट आता मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत
मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला आता शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सांगितले जात आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेता यावा, यासाठी शिंदे गट सर्वोच्च न्यायालायात याचिका दाखल करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यासंदर्भात शिवसेना नेते अनिल परब यांना विचारले असता, आम्ही हे सुप्रीम कोर्टात पाहू, तिथेही लढू, अशी प्रतिक्रिया परब यांनी दिली.
दरम्यान, उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाला एक अट घातली, यात दोषी आढळले तर पुढच्या वेळी परवानगी नाकारण्यासाठी ते कारण ठरेल असाही इशारा न्यायालयाने दिला आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी देताना कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आश्वासन घेतले. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची जबाबदारी घ्यावी. पोलीस व्हिडीओ शुटींग करतील. काही घटना घडली आणि याचिकाकर्ते कोणत्याही घटनेला जबाबदार असल्याचे आढळले तर भविष्यात त्यांना तिथे दसरा मेळावा नाकारण्याचे कारण ठरू शकेल, असे न्यायालयाने म्हटले आहे.