हरीण विकणारे दोघे अटकेत

By Admin | Updated: June 14, 2015 23:27 IST2015-06-14T23:27:31+5:302015-06-14T23:27:31+5:30

कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील जंगलातून साप, शेकरू, खवले मांजर आदी जंगली प्राण्यांची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत आहे

The duo were arrested for selling deer | हरीण विकणारे दोघे अटकेत

हरीण विकणारे दोघे अटकेत

बोर्ली-मांडला : कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील जंगलातून साप, शेकरू, खवले मांजर आदी जंगली प्राण्यांची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत आहे. जंगली प्राणी पकडणारी टोळी प्राण्यांच्या लहान पिल्लांना पकडून त्यांची जिवंत विक्री करत आहे. अशा प्रकारे हरणाची विक्री करणाऱ्या रायगडमधील दोघांना सांगली पोलिसांनी अटक केली आहे.
रायगड जिल्ह्यातील संजय धुमाळ (३८, रा.लोहारी ता. पोलादपूर) व फिरोज कुडपकर (२५,रा. वारंग ता. महाड) या दोघांना सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पेठ ता. वाळवा येथे पकडले असून दोन हरणांसहित या दोघांना शुक्रवारी वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. इस्लामपूर येथील पेठच्या पेट्रोल पंपाजवळ बोलेरो गाडीतून हरणाची विक्री करण्यासाठी दोघे जात असल्याची माहिती सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणविभागाला बुधवारी रात्री मिळाली होती. सांगली पोलीस अधिकारी सुनील फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकून फिरोज कुडपकर व संजय धुमाळ यांना पकडले. तीन ते साडे तीन महिन्याची हरणाची दोन पिल्ले इस्लामपूर येथील एका व्यक्तीला विकण्यासाठी आणली होती. मात्र खरेदी करणाऱ्याला पोलिसांची चाहूल लागल्यामुळे तो तिथे आला नाही त्यामुळे ती व्यक्ती कोण याचा तपास लागला नाही. या दोन्ही हरणांची किंमत सुमारे १० लाख रूपये आहे. पोलिसांनी पकलेली दोन्ही हरणे भेकर जातीची आहेत. यातील फिरोज कुडपकर हा सराईत गुन्हेगार आहे. (वार्ताहर)

Web Title: The duo were arrested for selling deer