कॉन्सर्टमध्ये नशेची धुंद अन् इटलीचा ‘९९९९९९९९९’ डीजे, अशी झाली ड्रग्सची डिलिव्हरी, ८० टक्के विद्यार्थी बेधुंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 12:53 IST2026-04-15T12:53:13+5:302026-04-15T12:53:28+5:30
NESCO Drugs Party: गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शनिवारी रात्री इटलीच्या ‘९९९९९९९९९’ या टेक्नो डीजेच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये मुंबईसह राज्यातून तरुणाईने हजेरी लावली होती. याच कॉन्सर्टमध्ये डीजेच्या तालावर पार्टी ड्रग्ज म्हणून ओळखले जाणारे एक्स्टॅसी (एमडीएमए) घेऊन तरुणाई बेधुंद झाली होती.

कॉन्सर्टमध्ये नशेची धुंद अन् इटलीचा ‘९९९९९९९९९’ डीजे, अशी झाली ड्रग्सची डिलिव्हरी, ८० टक्के विद्यार्थी बेधुंद
मुंबई - गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शनिवारी रात्री इटलीच्या ‘९९९९९९९९९’ या टेक्नो डीजेच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये मुंबईसह राज्यातून तरुणाईने हजेरी लावली होती. याच कॉन्सर्टमध्ये डीजेच्या तालावर पार्टी ड्रग्ज म्हणून ओळखले जाणारे एक्स्टॅसी (एमडीएमए) घेऊन तरुणाई बेधुंद झाली होती. अटक केलेल्या आरोपींनी ऑनलाईन कुरियर ॲपद्वारे ड्रग्जची दक्षिण मुंबईत डिलिव्हरी केल्याची माहिती पोलिसांना दिली.
या लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टसाठी मुंबई, महाराष्ट्रसह विविध राज्यांतून महाविद्यालयांमधील तब्बल तीन ते चार हजार विद्यार्थी उपस्थित होते. काही खासगी नोकरी करणारे होते. यातील बहुतांश विद्यार्थी मुंबईच्या काही नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेणारे असून कॉलेजच्या तसेच खासगी हॉस्टेलमध्ये राहणारे होते.
मुंबईतील जमुनालाल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या दोन तरुण-तरुणीचा या कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाला. जवळपास ८० टक्के तरुणाई यावेळी नशेत असल्याचा संशय आहे. मृत्यू झालेल्या दोन्ही विद्यार्थ्यांनी नशेच्या दोन गोळ्या घेतल्याने ड्रग्जचा ओव्हरडोज होऊन मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल येणे बाकी आहे.
आनंद पटेलने विद्यार्थी प्रतीक पांडेला हे ड्रग्ज पुरवले. पुढे त्याने आणि रौनक खंडेलवालने अन्य विद्यार्थ्यांना दिल्याचे समोर आल्याने त्यांना
अटक केली. दरम्यान, आनंद याला अटक करण्यात आल्याने या प्रकणावर अधिक प्रकाशझोत पडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई पोलिस त्या दिशेने अधिक तपास करीत आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
‘९९९९९९९९९’ टेक्नो डीजे नेमका प्रकार काय आहे?
इलेक्ट्रॉनिक म्युझिकच्या दुनियेत इटलीतील ‘९९९९९९९९९’ या टेक्नो डीजे जोडीची जोरदार चर्चा सुरू आहे. ‘नाईन टाईम्स नाईन’ या नावाने ओळखली जाणारी ही जोडी हार्ड टेक्नो आणि ॲसिड टेक्नो प्रकारातील म्युझिकसाठी प्रसिद्ध आहे. २०१६ मध्ये सुरू झालेल्या या प्रोजेक्टने अल्पावधीतच जागतिक स्तरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पारंपरिक गाण्यांऐवजी ही जोडी डीजे मशीन, सिंथेसायझर आणि ड्रम मशीनच्या साहाय्याने लाइव्ह परफॉर्मन्समध्येच म्युझिक तयार करते. ते आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सवांमध्ये परफॉर्म करत असून, त्यांच्या लाइव्ह सेट्सला मोठी गर्दी होत आहे.
टेक्नो म्युझिकसोबत वाढत चाललेल्या रेव्ह आणि क्लब कल्चरमुळे तरुणांमध्ये याची लोकप्रियता वाढत गेली. नशेखोर अशा कार्यक्रमांमध्ये ड्रग्ज सेवन करून गेल्यानंतर झिंग अधिक वाढत असल्याच्या समजुतीने नशेचा आधार घेतात. मात्र हीच त्यांच्यासाठी जीवघेणी ठरत असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले.