Don't want 'chief minister' of Thackeray family, 4 terms of Congress for support shiv sena | ठाकरे कुटुंबातील 'मुख्यमंत्री' नको, पाठिंब्यासाठी काँग्रेसच्या शिवसेनेसमोर 4 अटी 

ठाकरे कुटुंबातील 'मुख्यमंत्री' नको, पाठिंब्यासाठी काँग्रेसच्या शिवसेनेसमोर 4 अटी 

मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सोडविण्यासाठी सोनिया गांधींचे निकटवर्तीय अहमद पटेल, के. सी वेणुगोपाळ आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे मुंबईसाठी रवाना झालेले आहेत. राष्ट्रवादीला राज्यपालांनी दिलेल्या सत्तास्थापनेच्या निमंत्रणानंतर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. मात्र, काँग्रेसने शिवसेनेला सत्तेत सोबत घेण्यासाठी काही अटी ठेवल्याची माहिती आहे. त्यामध्ये शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्यावतीने समन्वय समिती तयार करावी, अशी आहे. 

शरद पवार यांची आज सकाळी सोनिया गांधी यांच्यासोबत फोनवरुन चर्चा झाली असल्याची माहिती के. सी वेणुगोपाळ यांनी दिली. याबाबत ट्विट करुन के. सी वेणुगोपाळ यांनी सांगितले की, आज सकाळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात फोनवरुन संवाद झाला. या संवादानंतर शरद पवार यांच्या भेटीला अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे आणि मी स्वत: पुढील चर्चा करण्यासाठी मुंबईला जात आहोत. लवकरात लवकर शरद पवारांशी आमची भेट होईल असं त्यांनी म्हटलं आहे. या भेटीनंतरच महाशिवआघाडीच्या सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार आहे. मात्र, काँग्रेसकडून काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. 

काँग्रेसच्या अटीनुसार एक कॉमन मिनिमम प्रोग्राम बनविण्यात यावा, दुसरी अट म्हणजे ठाकरे कुटुंबातील व्यक्ती मुख्यमंत्रीपदी नको आणि समन्वय समितीचे गठन करण्याच्या अटी काँग्रेसने ठेवल्या आहेत. त्यासोबतच, 4 आमदारांच्या पाठीमागे 1 मंत्रीपद असंही समिकरण काँग्रेसला इच्छुक असल्याचं समजते. त्यामुळे पवारांसोबतच्या बैठकीत काँग्रेसकडून या सर्व मुद्द्यांवर चर्चा होईल. त्यानंतरच, राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा संपुष्टात येईल. दरम्यान, राज्यपाल महोदयांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भात शिफारस केल्याची माहिती आहे.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Don't want 'chief minister' of Thackeray family, 4 terms of Congress for support shiv sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.