लॉकडाऊनबाबत कोणाच्याही दबावाला बळी पडू नका; मुख्यमंत्र्यांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 00:59 IST2020-07-19T00:59:15+5:302020-07-19T00:59:25+5:30
शहरी भागातील कोरोना ग्रामीण भागात पसरू देऊ नका, असे मुख्यमंत्री म्हणाले.

लॉकडाऊनबाबत कोणाच्याही दबावाला बळी पडू नका; मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुंबई : लॉकडाऊन वाढविणे किंवा शिथिल करणे या बाबतचा निर्णय स्थानिक नेते वा इतर कोणाच्याही दबावाला बळी न पडता लॉकडाऊन लावून रोगाला अटकाव करण्याची खात्री असेल तर विश्वासाने पण तारतम्याने निर्णय घ्या, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिले. लॉकडाऊनवरून विविध शहरांमध्ये विरोधाच्या प्रतिक्रिया उमटत असताना त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे आदेश दिले आहेत.
विविध पालिकांनी त्यांच्या क्षेत्रात लॉकडाऊन केले आहे, त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणावर रुग्ण आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे, रुग्णांना उपचारांची सुविधा मिळणे परिणामत: मृत्यूदर लक्षणीयरित्या कमी करणे यासाठी झाला पाहिजे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांचा सहभाग मिळवून कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करा. शहरी भागातील कोरोना ग्रामीण भागात पसरू देऊ नका, असे मुख्यमंत्री म्हणाले.
धार्मिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रमांना बंदी कायम ठेवली आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, सणवार साजरे करताना नवे कंटेन्मेंट क्षेत्र वाढू नये. काही दिवसांपूर्वी धारावीच्या मॉडेलचे जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केले. मुंबईने अत्यंत पारदर्शक पद्धतीने काम केले आहे. कुठलीही माहिती लपविली नाही. हे संकट किती भीषण आहे आणि त्याचा मुकाबला राज्य सरकारने कसा केला, हे देखील आपण नागरिकांना विश्वासात घेऊन मोकळेपणाने सांगितले आहे. धारावीसारखा परिणाम आपल्याला राज्यात इतरत्रही दाखवा असे ते म्हणाले.