दिवाळी ‘पाडवा’ ठरला दुर्घटनांचा; आनंद बदलला दु:खात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 08:40 IST2025-10-24T08:38:56+5:302025-10-24T08:40:05+5:30
भायखळा, बोरीवली, मालाडमध्ये तिघांचा मृत्यू

दिवाळी ‘पाडवा’ ठरला दुर्घटनांचा; आनंद बदलला दु:खात
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : दिवाळी पाडव्याच्या दिवशी मुंबईत पाच ठिकाणी दुर्घटना घडल्या. यात तिघांचा मृत्यू झाला, तर ८ जण जखमी झाले. ऐन दिवाळीच्या सणात या घटनांमुळे भायखळा, बोरीवली, मालाडमध्ये अनेक कुटुंबांवर शोककळा पसरली.
गिरगावातील एका इमारतीचा भाग कोसळला. बोरीवली, मालाड आणि भायखळ्यात आग लागली. मालाडमध्ये समुद्र किनाऱ्यावर एक जण वाहून गेला. बोरीवली पश्चिम येथील गोराई परिसरात नालंदा गृहनिर्माण सोसायटीत बुधवारी सकाळी ११:३० च्या सुमारास आग लागली.
बैठ्या चाळीतील गाळ्यामध्ये ही आग लागली होती. या आगीमुळे सजावटीचे साहित्य, लाकडी सामान, कपडे जळून खाक झाले. आग बाजूच्याच एक मजली इमारतीतही पसरली. दुपारी २ च्या सुमारास आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले. या दुर्घटनेत पहिल्या मजल्यावरून दोन पुरुषांना अग्निशमन दलाने सुखरूप बाहेर काढले.
एक महिला पहिल्या मजल्यावरच्या स्नानगृहात अडकली होती. पूजा विनयचंद्र पारेख (३७) ही महिला ५० टक्के होरपळली असून रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
वाहून गेलेल्याचा मृत्यू
मालाड पश्चिम येथील आक्सा समुद्रात बुधवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास पोहायला गेलेल्या चारपैकी एक जण वाहून गेला. जे. जे. नर्सिंग होम, आयएनएस हमला गेट समोरच्या भागात समुद्रकिनाऱ्यावर हे चौघे जण पोहायला गेले होते.
चार जणांपैकी तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. गुरुवारी दुपारी एकाचा शोध घेण्यात बचाव पथकाला यश आले. त्याला पोलिसांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांकडून त्याला मृत घोषित केले आहे. मयांक डोलिया असे मृताचे नवा असून, तो १३ वर्षांचा होता.
म्हाडाच्या इमारतीचा भाग पडला
दुसरी दुर्घटना गिरगाव येथील चिराबाजार परिसरात सकाळी ६:१५ च्या सुमारास घडली. जगन्नाथ शंकरशेट मार्गावरील आत्मारामन ही म्हाडाची जुनी इमारत असून या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका खोलीच्या स्वयंपाकघराचा भाग कोसळला. यामध्ये ठाकरजी गाला (७५) आणि गुणवंती गाला (७१) जखमी झाले. त्यापैकी गुणवंती यांना ग्रँट रोड येथील भाटिया रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
सात मजली इमारतीत आग
मालाड पश्चिमेकडील लिंक रोड परिसरात भूमी क्लासिक इमारतीत पहाटे ५ वाजता आग लागली होती. इनॉर्बिट मॉलच्या जवळच असलेल्या या सात मजली इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील एका बंद घरात ही आग लागली होती. आग पसरत गेली आणि सातव्या मजल्यावरील चारही घरांना आगीचा वेढा पडला. सहाव्या मजल्यावरील बंद घरातील विद्युत यंत्रणा, विद्युत वाहिन्या, घरातील सामान, कपडे, टेबल-खुर्च्या, पडदे, वातानुकूलित यंत्र, दरवाजे, खिडक्या आदी आगीत भस्मसात झाले. या दुर्घटनेत एक चोवीस वर्षांचा तरुण जखमी झाला.
भायखळ्यात इमारतीचा भाग कोसळला
भायखळा परिसरातील भानुशाला या एक मजली इमारतीचा भाग पडला. दुपारी १२:४५ वाजता ही घटना घडली. या दुर्घटनेत सात जण जखमी झाले. जखमींना पालिकेच्या नायर रुग्णालयात व खासगी भाटिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुलाम रसूल (२४), मोहम्मद सय्यद (५९) यांची प्रकृती स्थिर आहे. तर पाच जणांना उपचार करून घरी पाठवण्यात आले.