नाराज निरूपम शिंदे गटाच्या वाटेवर, चर्चांना उधाण 

By मनोहर कुंभेजकर | Published: March 18, 2024 05:15 PM2024-03-18T17:15:54+5:302024-03-18T17:17:21+5:30

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता काल रात्री इंडिया आघाडीतील सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत काल रात्री शिवाजी पार्कवर झाली.

disgruntled sanjay nirupam leave congress also on the way to the shinde group sparks discussions | नाराज निरूपम शिंदे गटाच्या वाटेवर, चर्चांना उधाण 

नाराज निरूपम शिंदे गटाच्या वाटेवर, चर्चांना उधाण 

मनोहर कुंभेजकर, मुंबई :  काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता काल रात्री इंडिया आघाडीतील सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत काल रात्री शिवाजी पार्कवर झाली. या सभेत इंडिया आघाडीचा लोकसभेचा प्रचाराचा नारळ फुटला. मात्र काँग्रेसवर नाराज असलेले माजी खासदार संजय निरुपम हे काल शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीच्या सभेला स्टेजवर गैरहजर होते. राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेत निरुपम सहभागी झाले होते.

निरुपम यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली होती.ही जागा कॉंग्रेसला मिळाली पाहिजे अशी त्यांनी आपली कैफियत मांडली. मात्र उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघाची ही जागा महाविकास आघाडीने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सोडली असल्याने निरुपम यांना काँग्रेसचे तिकीट देण्यास राहुल गांधी यांनी नकार दिला असल्याची माहिती सूत्रांनी लोकमतला दिली. त्यामुळे नाराज निरुपम हे शिंदे गटाच्या वाटेवर असून येत्या एक दोन दिवसात ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर शिंदे गटात प्रवेश करतील अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी लोकमतला दिली.

याबाबत निरुपम यांनी आपण शिंदे गटात प्रवेश करणार यात तथ्य नसल्याचे सांगितले.आपली राहुल गांधीची भेट झाली,मात्र तिकीटा बाबत काही बोलणी झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.तर शनिवारी निरुपम हे पदयात्रेत सहभागी झाले होते,मात्र त्यांची तब्येत बरी नसल्याने काल ते सभेला उपस्थित नसल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून शनिवार दि, ९ मार्च रोजी शिवसेना शाखांच्या भेटी दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून शिवसेना उपनेते व युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तिकर यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती.त्यानंतर निरुपम यांनी उद्धव ठाकरेंच्या निर्णयाबाबत आगपाखड करत सोशल मीडियावर व पत्रकार परिषद घेत जाहिर नाराजी व्यक्त केली होती.

उत्तर पश्चिम मुंबईच्या जागेसाठी भाजप व शिंदे गट यांच्यात अजूनही रस्सीखेच चालली असून २०१४  पासून सलग दोन टर्म गजानन कीर्तिकर येथून खासदार असल्याने ही जागा शिंदे गटाला हवी आहे.तर कोणत्याही परिस्थितीत उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्याचा निरुपम यांनी ठाम निर्धार केला आहे. ही जागा शिंदे गटाला गेल्यास ते येथून निवडणूक लढवतील अशी माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: disgruntled sanjay nirupam leave congress also on the way to the shinde group sparks discussions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.