ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 17:04 IST2025-08-15T15:34:13+5:302025-08-15T17:04:28+5:30
शिवसेनेला मोठे बेस्ट कामगारांनी केले, तुम्ही त्यांच्यासाठी काय केले. फक्त त्यांचा वापर करून घेतला. कामगार या लोकांना धडा शिकवतील अशी टीका प्रविण दरेकरांनी केली आहे.

ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
मुंबई - येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील अशी चर्चा सुरू आहे. त्यातच बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेने एकत्रित उत्कर्ष पॅनेल उभे केले. ठाकरे बंधू एकत्रितपणे लढणारी ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे बेस्ट पतपेढी निवडणुकीची बरीच चर्चा आहे. त्यातच आता ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या २ विश्वासू शिलेदारांवर जबाबदारी टाकली आहे. आता बेस्ट पतपेढी निवडणुकीत भाजपा आमदार प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वात सहकार समृद्धी पॅनल उतरणार आहे.
या निवडणुकीबाबत प्रवीण दरेकर म्हणाले की, गेली २५ वर्ष पतपेढीच्या माध्यमातून बेस्ट कामगारांना आपण काय दिले हे लक्षात घेतले पाहिजे. कामगार आज मोठ्या प्रमाणात नाराज आहे. बेस्ट पतपेढीच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार झाला. जेव्हा ही संस्था अडचणीत होती तेव्हा मुंबई जिल्हा बँकेच्या माध्यमातून आम्ही त्यांना ताकद दिली. २-३ कोटींची जागा बळकावल्या. बेस्ट कामगार घाम गाळतो, त्याच्या घामाचा पैसा तुमचे पोट भरण्यासाठी नाही. त्यामुळे आज या पतसंस्थेला उर्जित अवस्था देण्याची आवश्यकता आहे. ते आम्ही देऊ शकतो. जिल्हा बँक, राज्य सरकार म्हणून ताकद देऊ शकतो. प्रसाद लाड यांचे पॅनेल या निवडणुकीत जिंकेल असा विश्वास त्यांनी वर्तवला.
तर ठाकरे बंधू केवळ आगपाखड करत आहेत. शिव्या देण्यापलीकडे आणि एकमेकांचे आई-बाप काढण्याशिवाय काही येत नाही. आम्ही कोविड भत्ता तात्काळ राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून दिला. कर्मचाऱ्यांना पैसे मिळाले तुमच्या पोटात का दुखते? कर्मचारी आणि कामगार प्रसाद लाड यांच्या पॅनेलमागे उभे राहतील. बेस्टच्या जागांबाबत चौकशी सुरू आहे. त्यात काय भ्रष्टाचार झाला हे बाहेर येणार आहे. कष्टकऱ्यांचा हा पैसा आहे. बेस्ट कामगार तुमच्या अय्याशीसाठी पैसे कमावतात का? शिवसेनेला मोठे बेस्ट कामगारांनी केले, तुम्ही त्यांच्यासाठी काय केले. फक्त त्यांचा वापर करून घेतला. कामगार या लोकांना धडा शिकवतील आणि प्रसाद लाड यांना ताकद देतील असंही आमदार प्रवीण दरेकर यांनी म्हटलं.
दरम्यान, बेस्टमध्ये माझ्या २ यूनियन आहेत, त्याशिवाय ५ छोट्या छोट्या युनियनला घेऊन मी ही निवडणूक लढत आहे. बेस्टचे अनेक प्रश्न मी सोडवले. कोविड भत्त्याचा जो प्रश्न होता तो काल सुटला, ५२ कोटी रुपये कामगारांना मिळाले. १९ हजार कर्मचाऱ्यांना १० ते २२ हजार त्यांच्या खात्यात आले. बदल्यांचे प्रश्न सुटले. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या घराचा प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे ठेवला आहे. मुंबईतील बेस्टचे २७ डेपो, २७ वसाहती आहेत. या जागा न विकता भाडेस्वरुपात १५ लाखात याठिकाणी कर्मचाऱ्यांना घरे मिळावी अशी आमची मागणी असल्याचे आमदार प्रसाद लाड यांनी सांगितले.