NCP विलीनीकरणाची चर्चा अन् सुनेत्रा पवार, पार्थ पवार CM फडणवीसांच्या भेटीला; घडामोडींना वेग
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 18:38 IST2026-02-17T18:34:38+5:302026-02-17T18:38:24+5:30
Deputy CM Sunetra Ajit Pawar Meet CM Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

NCP विलीनीकरणाची चर्चा अन् सुनेत्रा पवार, पार्थ पवार CM फडणवीसांच्या भेटीला; घडामोडींना वेग
Deputy CM Sunetra Ajit Pawar Meet CM Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार या आता राजकारणात सक्रीय झालेल्या पाहायला मिळत आहे. मंत्रिमंडळ बैठक, पुणे आणि बीड जिल्ह्याची बैठक यात त्यांनी सहभाग नोंदवला. तसेच राज्यातील ७५ शाळांना अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र देण्यात आल्या प्रकरणाची सुनेत्रा पवार यांनी गंभीर दखल घेऊन दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. याशिवाय दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाच्या चर्चा अद्यापही राजकीय वर्तुळात सुरू आहेत. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या अपघाताची केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी व्हावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत निवेदन सादर केले. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ तसेच पार्थ पवार उपस्थित होते. अपघाताच्या घटनेची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, तसेच सत्य परिस्थिती जनतेसमोर यावी, यासाठी प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. याबाबत सुनील तटकरे यांनी पत्रकारांना माहिती दिली.
सुनेत्रा पवार, पार्थ पवार CM देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ आणि पार्थ पवार अशा सर्वांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झाला, त्याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांना एक निवेदन दिले. या पूर्ण प्रकरणाची सीबीआयच्या माध्यमातून चौकशी करावी, अशी मागणी आम्ही केलेली आहे. निवेदनाची दखल घेत राज्य सरकार केंद्र सरकारकडे अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूची चौकशी करण्याची मागणी करणार आहे. तसा पत्रव्यवहार केला जाईल. मुख्यमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तशी पावले उचलली जातील, असे सुनील तटकरे यांनी सांगितले.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या तात्काळ चर्चेला ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नकार दिला आहे. याचा सर्वस्वी निर्णय सुनेत्रा पवार यांच्यावर अवलंबून असेल. प्राधान्याने पक्ष हा सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व मजबूत करणे आणि राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करणे यादृष्टीने काम करत आहे. राष्ट्रीय अध्यक्ष निवडल्यानंतरच विलीनीकरणाचा मुद्दा हाती घेतला जाईल आणि निर्णय त्या घेतील असे भुजबळांनी स्पष्ट केले.