ट्रक अन् स्कूटरच्या भीषण अपघातात पतीचा जागीच मृत्यू; तर पत्नी गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 14:04 IST2019-02-19T14:00:50+5:302019-02-19T14:04:24+5:30
अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांना ट्रक चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं.

ट्रक अन् स्कूटरच्या भीषण अपघातात पतीचा जागीच मृत्यू; तर पत्नी गंभीर जखमी
मुंबई - पश्चिम द्रुतगती मार्गावर जोगेश्वरीनजीक ट्रक आणि स्कूटरचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव ट्रकने स्कूटरला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात स्कूटरवरील पती विश्वास मध्यालकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे.
सोमवारी रात्री उशिरा हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. विश्वास मध्यालकर आपल्या पत्नीसोबत स्कूटरवरुन जात होते. त्या दरम्यान जोगेश्वरी फ्लायओव्हरवर एका भरधाव ट्रकने त्यांच्या स्कूटरला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. या धडकेनंतर झालेल्या अपघातात विश्वास यांची पत्नी स्कूटरवरुन दूरवर फेकल्या गेल्या. मात्र, दुर्दैवाने विश्वास यांचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाला. विश्वास यांना भरधाव ट्रकने जवळजवळ 20 फूट लांब फरफटत नेलं. त्यामुळे अपघातात विश्वास यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीला जखमी अवस्थेत नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृतीही गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांना ट्रक चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं.