coronavirus: "मुख्यमंत्री आजच मोठा निर्णय घेणार, लॉकडाऊनबाबत नियमावली जाहीर होणार"
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 13:18 IST2021-04-13T13:15:36+5:302021-04-13T13:18:20+5:30
coronavirus in Maharashtra : कोरोनाच्या फैलावामुळे राज्यात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी महाराष्ट्रामध्ये राज्यव्यापी लॉकडाऊन लागणार हे आता स्पष्ट झाले आहे.

coronavirus: "मुख्यमंत्री आजच मोठा निर्णय घेणार, लॉकडाऊनबाबत नियमावली जाहीर होणार"
मुंबई - कोरोनाच्या फैलावामुळे राज्यात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी महाराष्ट्रामध्ये (coronavirus in Maharashtra) राज्यव्यापी लॉकडाऊन लागणार हे आता स्पष्ट झाले आहे. दरम्यान, राज्यात लॉकडाऊन लावण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आजच मोठा निर्णय घेणार असून, त्याची नियमावली आजच जाहीर होईल, असे विधान मुंबईचे पालकमंत्री आणि राज्य सरकारमधील मंत्री अस्लम शेख (Aslam Sheikh) यांनी केले आहे. (CM to take big decision today, Aslam Sheikh's suggestive statement regarding lockdown)
लॉकडाऊनबाबत माहिती देताना अस्लम शेख म्हणाले की, आम्हाला कोरोनाची चेन ब्रेक करायची आहे, लोकांना सोबत घेऊन, त्यांचे सल्ले घेऊन याबाबत आम्हाला निर्णय घ्यायचा आहे. त्यासाठी एक चांगली एसओपी लागू करायची आहे. मला असं वाटतं की, आजच याबाबतची नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महाराष्ट्रामध्ये आजही परिस्थिती नियंत्रणात आहे, असेही शेख यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्राय खासगी रुग्णालयात वेटिंग लिस्ट आहे. मात्र सरकारी रुग्णालयांमध्ये कोविड सेंटरमध्ये अद्यापही बेड आणि ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत, अशी माहिती अस्लम शेख यांनी दिली.
कोरोनाच्या टास्क फोर्समधील काही जणांनी २१ दिवसांच्या लॉकडाऊनचा सल्ला दिला होता. काही जणांनी एवढ्या लॉकडाऊनमुळे त्रास होईल असे म्हटले होते. काही जणांनी १४ दिवसांच्या तर काही जणांनी ८ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करावी असा सल्ला दिला आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांपर्यंत पोहोचले जात आहे. मात्र काही राज्ये कोरोनाचे रुग्ण लपवत आहेत. त्यांच्याकडे १५ दिवसांनंतर बिकट परिस्थिती निर्माण होईल, असा इशाराही त्यांनी दिला.