Coronavirus:..मग जनतेत संभ्रम नको, म्हणून विचारलं; आमदार नितेश राणेंचा सत्ताधाऱ्यांना चिमटा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2020 15:44 IST2020-04-12T15:43:00+5:302020-04-12T15:44:08+5:30
राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार आहे. तिन्ही पक्षांनी आघाडी करुन राज्यात सत्ता मिळवली आहे.

Coronavirus:..मग जनतेत संभ्रम नको, म्हणून विचारलं; आमदार नितेश राणेंचा सत्ताधाऱ्यांना चिमटा
मुंबई – राज्यात कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढत असताना राजकीय नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. राज्यात गोरगरिबांसाठी महाविकास आघाडी सरकारने शिवभोजन योजना सुरु केली आहे. कोरोना संकटकाळात या योजनेचा फायदा जास्तीत जास्त लोकांना मिळावा यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत. एरव्ही १० रुपयेला मिळणारी थाळी पुढील ३ महिने ५ रुपये दरात दिली जाणार आहे.
मात्र राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार आहे. तिन्ही पक्षांनी आघाडी करुन राज्यात सत्ता मिळवली आहे. मात्र याच सरकारच्या योजनेला पुरक पुणे जिल्हा परिषदेने शरद भोजना योजना आणली आहे. यावरुन भाजपा आमदार नितेश राणे यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे. नितेश राणेंनी ट्विट करुन म्हटलं की, ही योजना छान आहे पण राज्यात महाविकास आघाडीची शिवभोजन योजना सगळीकडे सुरु आहे. मग जनतेत संभ्रम नको म्हणून विचारलं असा चिमटा त्यांनी राज्य सरकारला लगावला आहे.
छान 👍🏻👍🏻👍🏻
— nitesh rane (@NiteshNRane) April 12, 2020
पण...
🤔🤔🤔 pic.twitter.com/k1rIHyHfqF
सध्या पुणे जिल्ह्यात सर्व तालुक्यात विविध ४० ठिकाणी तातडीने शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या शिवभोजन केंद्रांतून दररोज ३ हजार २५० थाळीचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांकडून केवळ ५ रुपये घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड यांनी दिली होती. शिवभोजन योजनेचा तालुका स्तरावर विस्तार करून पुढील तीन महिने ५ रुपये इतक्या दरात शिवभोजन थाळी देण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
पण..
— nitesh rane (@NiteshNRane) April 12, 2020
राज्यात महा विकास आघाडी ची शिव भोजन योजना सगळी कडे सुरु आहे..
मग..
जनतेत संभ्रम नको म्हणून विचारल..
😊😊😊
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मजुर, स्थलांतरीत, बेघर तसेच बाहेरगावचे विद्यार्थी व इतर लोक यांचे जेवणाअभावी हाल होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात शासनाकडून केवळ तालुका स्तरावर शिवभोजन केंद्रे सुरू करण्यात आली होती. आता शासनाने सर्व तालुक्याच्या ठिकाणी ही शिवभोजन केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. पुढील तीन महिन्यासाठी शिवभोजनाच्या प्रती थाळीचा दर 5 रुपये इतका करण्यात आला आहे. शिवभोजन थाळीची किंमत शहरी भागात ५० रुपये प्रती थाळी असून ग्रामीण भागात ३५ रुपये इतकी आहे. प्रत्येक ग्राहकाकडून मिळालेल्या ५ रुपये एवढ्या रकमेव्यतिरिक्त उर्वरित रक्कम शहरी भागात प्रती थाळी ४५ रुपये आणि ग्रामीण भागात प्रती थाळी ३० रुपये असे अनुदान संबंधित केंद्र चालकाला देण्यात येणार असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. मग राज्य शासनाच्या शिवभोजन योजनेची अंमलबजावणी सुरु असताना शरद भोजना योजना आणून जनतेला संभ्रमात टाकलं जात आहे का? असा सवाल विरोधकांनी केला आहे.