"गजाभाऊ, तुमच्या रक्तात भेसळ आहे"; ऐन दिवाळीत शिवसेनेच्या २ नेत्यांमध्ये शिमगा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 06:19 PM2023-11-13T18:19:25+5:302023-11-13T18:20:04+5:30

शरद पवारांना कधी भेटलो, कुठे भेटलो हे सांगा, लोकांना बदनाम कसं करायचे हे गजाभाऊंकडून शिकावे लागेल असं रामदास कदमांनी सांगितले.

Controversy among Shiv Sena leaders, Ramdas Kadam's warning to Gajanan Kirtikar | "गजाभाऊ, तुमच्या रक्तात भेसळ आहे"; ऐन दिवाळीत शिवसेनेच्या २ नेत्यांमध्ये शिमगा

"गजाभाऊ, तुमच्या रक्तात भेसळ आहे"; ऐन दिवाळीत शिवसेनेच्या २ नेत्यांमध्ये शिमगा

मुंबई – दिवाळीत शिमगा बघायला मिळतोय, शिवसेना पक्षाच्या नेत्यांमध्येच फटाके फुटतायेत, हा खरा तर बेशिस्तपणा आहे. गजाभाऊंचे वय झालंय, त्यांना डॉक्टरांची गरज आहे. आपल्याच पक्षातील नेत्यांवर प्रेसनोट काढतोय, पक्षप्रमुखांकडे बसले असते, चर्चा केली असती, पण ते न करता प्रेसनोट काढून माझ्यावर बेछुट आरोप केलेत, गजाभाऊसारख्या ज्येष्ठ नेत्याकडून ही अपेक्षा नव्हती. पण भेसळ माझ्या रक्तात नाही तर तुमच्या रक्तात आहे असा पलटवार शिवसेना नेते रामदास कदम यांनी खासदार गजानन किर्तीकर यांच्यावर केला आहे.

रामदास कदम म्हणाले की, १९९० मध्ये मी गजाभाऊंना पाडण्याचा प्रयत्न केला असा आरोप केला, परंतु त्यावेळी मी कांदिवली पूर्वेत शाखाप्रमुख होतो, मला बाळासाहेबांनी रत्नागिरी खेडमधलं तिकीट दिले होते. माझ्यासमोर केशव भोसले उमेदवार होते, त्यांच्यासोबत दाऊद होतो, तेव्हा दाऊद वॉन्टेड नव्हता. माझी लढाई दाऊदसोबत झाली, मी माझी लढत देत असताना त्यांना पाडायला मी इथं कधी आलो? आणि हे ३३ वर्षांनी स्वप्न पडले, एखाद्याला बदनाम करण्यासाठी गजाभाऊसारखा माणूस कटकारस्थान करू शकतो, ३३ वर्षांनी धादांत खोटे त्यांना कळाले असा टोला त्यांनी लगावला आहे.

तसेच कशाला खोटे बोलता? २००९ मध्ये उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून अनंत गीतेने मला गुहागर मतदारसंघात पाडले. जेव्हा गीतेंची लोकसभा निवडणूक आली तेव्हा ज्याने मला पाडले त्या अनंत गीतेंचे काम मी करणार नाही असं मी उद्धव ठाकरेंना सांगितले. मग मला हेलिकॉप्टर देऊन राज्यभर दौऱ्यावर पाठवले. मी तेव्हा खेडला गेलो नाही. माझ्या रक्तात भेसळ नाही, भेसळ गजाभाऊ तुमच्या रक्तात आहे. आपल्या मुलासाठी बेईमानी तुम्ही करताय, याची जाणीव उभा महाराष्ट्र बघतोय., तुमचे पितळ उघडे पाडले म्हणून तुमचे पित्त खवळलंय. जेव्हा राणे पक्षातून बाहेर पडले तेव्हा एकटा रामदास कदम डोक्याला कफन बांधून फिरलाय आणि गद्दार कोणाला म्हणताय असा सवाल रामदास कदमांनी गजानन किर्तीकरांना विचारला.

दरम्यान, शरद पवारांना कधी भेटलो, कुठे भेटलो हे सांगा, लोकांना बदनाम कसं करायचे हे गजाभाऊंकडून शिकावे लागेल. नाईलाजाने मला याचा खुलासा करावा लागतोय. आपल्या पक्षातील नेताच गद्दार म्हणतोय, जर राष्ट्रवादी जाणार होतो मग का गेलो नाही. बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाला. मी कडवट शिवसैनिक बेईमानी माझ्या रक्तात नाही. तुमचा सगळा फंड मुलगा वापरतोय, बॅनरवर तुमचा मुलगा गजानन किर्तीकर यांच्या फंडातून असा उल्लेख करतोय. मुलगा उद्धव ठाकरेंकडे, तुम्ही एकनाथ शिंदेंकडे...त्यानंतर तुम्ही प्रचार न करता तुम्ही मुलाला बिनविरोध निवडून आणणार ही साधी गोष्ट आहे असा आरोपही कदमांनी गजानन किर्तीकरांवर लावला. पुत्रप्रेमासाठी तुम्ही नेत्याला सोडत नाही. पक्षातील नेत्यालाच बदनाम करताय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गजानन किर्तीकरांना बोलावून समज दिली पाहिजे. तुम्ही ज्येष्ठ आहात. यापुढे जर बोलले तर मला वेगळ्या भाषेत बोलावे लागेल. मला पुष्कळ बोलता येते. मी संयम ठेवलाय. पक्षातील मतभेद उभ्या राज्याला दाखवणे हे अशोभनीय आहे असंही कदमांनी म्हटलं.

Web Title: Controversy among Shiv Sena leaders, Ramdas Kadam's warning to Gajanan Kirtikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.