लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई:मोबाइलवर सतत स्क्रोलिंग करणे, रिल्स, व्हिडीओ पाहिल्याने मेंदूवर होतो. डिजिटल ओव्हरलोड येत आहे. त्यामुळे स्मरणशक्ती कमी होऊन एकाग्रता आणि झोपेवरही दुष्परिणाम विचारशक्तीही कमी होते. याच्या विळख्यात लहान मुलेच नव्हेतर मोठेही गुरफटत आहेत. मुलांचा स्क्रीन टाईम वाढल्याने मेंदूच्या विकासावर गंभीर परिणाम होत असल्याचा इशारा न्यूरोलॉजिस्टनी दिला आहे.
मोबाइलवर टाईमपास करण्याचे अनेकांना व्यसन जडले आहे. त्यामुळे तिशी-पस्तिशीतच मेंदूविकार, स्ट्रोक, एपिलेप्सी, मायग्रेन अशा आजारांना तोंड द्यावे लागत आहे. मुलांमध्ये वाढत्या स्क्रीन टाईमचा मेंदूवर घातक परिणाम होत आहे. अनेकदा लहान मुलांना व्यस्त ठेवण्यासाठी मोबाईल, टॅब किंवा टीव्ही स्क्रीनचा वापर केला जातो. त्याचे दुष्परिणाम फक्त डोळ्यांवर होत नसून, मेंदूच्या विकासावरही होतो, याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.
असे होतात दुष्परिणाम
जास्त स्क्रीन वापरामुळे मुलांचे लक्ष केंद्रित होण्याची क्षमता कमी होते. त्यांच्यात भावनिक अस्थिरता दिसून येते. चिडचिड, चिंता, भावनिक अस्थैर्य आणि सामाजिक अलिप्तता वाढते. झोपेचा नैसर्गिक पॅटर्न बिघडतो.
हे परिणाम केवळ क्षणिक नसून, त्यांच्या संपूर्ण मानसिक विकासावर परिणाम होतात. पाच वर्षाखालील बालकांचा मेंदू झपाट्याने विकसित होत असतो.
या काळात स्क्रीनसमोरील वेळ अधिक झाल्यास, बोलण्याची क्षमता, एकाग्रता आणि निर्णयक्षमता यासारख्या महत्त्वाच्या कौशल्यांचा विकासात अडथळा येतो.
पालकांनी मुलांना प्रत्यक्ष खेळ, मैदानी क्रिया, हालचाल आणि समोरासमोरील संवादातून शिकवले पाहिजे. मेंदूच्या आरोग्यपूर्ण विकासासाठी ही अनुभव प्रक्रिया अनिवार्य आहे. यामुळे मुलांमधील आरोग्यदायी मेंदूविकास घडवला जातो. - डॉ. शीतल गोयल, न्यूरोलॉजिस्ट