बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 12:38 IST2025-11-15T12:37:51+5:302025-11-15T12:38:43+5:30
येणाऱ्या काळात मुंबईत स्वबळावर लढले पाहिजे ही आमची भूमिका आहे. त्याशिवाय जे आमच्या समविचाराचे पक्ष असतील, त्यात आरपीय गट असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशीही आम्ही आघाडीबाबत चर्चा करू असं खासदार वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
मुंबई - बिहार निवडणुकीत अत्यंत निराशाजनक कामगिरी केल्यानंतर काँग्रेसने आता मुंबई स्वबळाचा नारा दिला आहे. आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीत न लढता स्वबळावर लढण्याची आग्रही मागणी पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून होत होती. त्यावरून आज झालेल्या मुंबई काँग्रेसच्या शिबिरात यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मुंबई महापालिकेतील सर्व वार्डांमध्ये काँग्रेस उमेदवार उभे करण्याची तयारी आहे अशी माहिती मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत मुंबईत काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे शिबीर पार पडले. त्यात एकला चलो रे नारा देण्यात आला. याबाबत खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, लक्ष्य २०२६ साठी मुंबई काँग्रेसचे आज शिबीर आयोजित करण्यात आले आहे. स्थानिक पातळीवर आघाडीबाबत निर्णय घ्यावा असं पक्षाने आम्हाला सांगितले होते. आज आमचे AICC प्रभारी रमेश चेन्नीथला आज इथं उपस्थित आहेत. आम्ही त्यांच्यासमोर आमचे म्हणणं मांडले आहे. येणाऱ्या काळात मुंबईत स्वबळावर लढले पाहिजे ही आमची भूमिका आहे. त्याशिवाय जे आमच्या समविचाराचे पक्ष असतील, त्यात आरपीय गट असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशीही आम्ही आघाडीबाबत चर्चा करू असं त्यांनी सांगितले.
तसेच मुंबई काँग्रेसचे नेते, पदाधिकारी यांची मागणी येत्या महापालिकेत स्वबळावर लढले पाहिजे ही आहे. मागील काळात काँग्रेसने निवडणूक लढवली होती. शेवटी ही निवडणूक कार्यकर्त्यांची असते, त्यामुळे त्यांना जर स्वबळावर लढण्याची इच्छा असेल तर त्यांची बाजू मी काँग्रेसच्या प्रभारींसमोर ठेवण्याचं मी काम केले आहे. येणाऱ्या काळात मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार, कंत्राटदारांची लॉबी याविरोधात काम करणार आहोत. मुंबईकरांचा पैसा पक्षाचे फंडिंग म्हणून वापरला जात आहे. त्यामुळे सामान्य मुंबईकरांवर अन्याय होत आहे त्याला वाचा फोडण्याचं काम आम्ही करणार आहोत असंही खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटलं.
एकच लक्ष्य - मुंबई महानगरपालिकेवर कॉंग्रेसचा तिरंगा!#JaiCongressVijayCongress#Lakshya2026#Mumbai#BMCElectionshttps://t.co/CtEYO9PUFl
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) November 15, 2025
दरम्यान, आम्ही देशाचं संविधान मानणारी मंडळी आहोत. आम्ही सर्वांना बरोबर घेऊन जाणारे आहोत. मुंबईत सातत्याने विकासावर आम्ही बोलत आहोत. मुंबईकरांचा त्रास आम्ही रोज पाहत आहोत. त्यामुळे मुंबईत सर्वांनी एकत्रित येऊन बोलण्याची गरज आहे, कारण ही देशाची आर्थिक राजधानी आहे. परंतु काही पक्षांच्या माध्यमातून वारंवार मारहाण केली जाते, कायदा सुव्यवस्था हातात घेतली जाते ही आमच्या संस्कृती शोभणारी नाही. महाविकास आघाडी किमान समान कार्यक्रमातून आखण्यात आली होती. संविधानाला जोडणारा कार्यक्रम असला पाहिजे मात्र काही पक्ष मारहाणीची भूमिका घेतात, लोकांना त्रास द्यायची भूमिका घेतात त्यामुळे काँग्रेसची ही विचारधारा नाही असं सांगत वर्षा गायकवाड यांनी नाव न घेता मनसेला टोला लगावला आहे.