आशिष शेलारांसमोर लढण्यासाठी तुल्यबळ उमेदवाराच्या प्रतीक्षेत काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 02:36 AM2019-08-13T02:36:07+5:302019-08-13T02:36:48+5:30

शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याणमंत्री आशिष शेलार विधानसभेत प्रतिनिधित्व करत असलेल्या वांद्रे पश्चिम मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीत शेलारांसमोर कोणाला उमेदवारी द्यावी, असा पेच काँग्रेससमोर पडला आहे.

Congress awaits Big candidate to fight against Ashish Shelar | आशिष शेलारांसमोर लढण्यासाठी तुल्यबळ उमेदवाराच्या प्रतीक्षेत काँग्रेस

आशिष शेलारांसमोर लढण्यासाठी तुल्यबळ उमेदवाराच्या प्रतीक्षेत काँग्रेस

Next

- खलील गिरकर
मुंबई : शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याणमंत्री आशिष शेलार विधानसभेत प्रतिनिधित्व करत असलेल्या वांद्रे पश्चिम मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीत शेलारांसमोर कोणाला उमेदवारी द्यावी, असा पेच काँग्रेससमोर पडला आहे. या मतदारसंघाचे काँग्रेसतर्फे प्रतिनिधित्व केलेले व राज्यमंत्री म्हणून काम केलेल्या बाबा सिद्दिकी यांनी यावेळी काँग्रेसकडून लढण्यास नकार दिल्याने काँग्रेससमोर उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे.

वांद्रे पश्चिममध्ये भाजपकडून आशिष शेलार यांचे नाव निश्चित आहे. शेलार यांच्यासमोर लढण्यासाठी तुल्यबळ उमेदवार मिळविण्यासाठी काँग्रेस सध्या झगडत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे या मतदारसंघातून लढण्यास कोणीही नेता इच्छुक नाही. शिवसेनेतर्फे गेल्या निवडणुकीत विलास चावरी रिंगणात होते, तर यावेळी शिवसेनेकडून काँग्रेसमधून पक्षात प्रवेश केलेले युवानेते राहुल कनाल यांच्या नावाची चर्चा आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे गेल्या निवडणुकीत तुषार आफळे उमेदवार होते. यावेळी आफळे इच्छुक नसून, मनसेचे मुंबई सचिव अल्ताफ खान निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे २०१४च्या निवडणुकीत आसिफ भामला रिंगणात होते, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडे निवडणूक लढवण्यास कोणीही इच्छुक उमेदवार समोर आलेला नाही. वंचित बहुजन आघाडीची या मतदारसंघात फारशी ताकद नसल्याने, त्यांच्याकडून जास्त काही हालचाली झालेल्या दिसून येत नाहीत.

काँग्रेसकडून विद्यमान नगरसेवक आसिफ झकेरिया यांच्या नावाची चर्चा आहे. त्याशिवाय माजी नगरसेवक व एमआयएमकडून वांद्रे पूर्व मतदारसंघातून दोन वेळा विधानसभा निवडणूक लढविलेल्या रेहबर खान (राजा) यांच्या नावाची चर्चा आहे. पक्षाने जबाबदारी दिल्यास निवडणूक लढविण्यात येईल, असे झकेरिया व खान यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा उपाध्यक्ष व आॅल इंडिया जमैतुल कुरैश फेडरेशनचे अध्यक्ष इम्रान बाबू कुरैशी काँग्रेस कडून लढण्यास इच्छुक आहेत. बाबू कुरैशी फाऊंडेशनच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्यावर उमेदवारीसाठी ते इच्छुक असल्याचे सांगण्यात आले. त्यांचे मामा शमीम कुरैशी यांनी १९८६मध्ये या मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले आहे.

२०१४च्या निवडणुकीत या मतदारसंघात आशिष शेलार ७४,७७९ मते मिळवून विजयी झाले होते. त्यांनी तत्कालीन काँग्रेसचे आमदार बाबा सिद्दीकी यांचा २६,९११ मतांनी पराभव केला होता. सिद्दीकी यांना ४७,८६८ मते मिळाली होती. शिवसेनेचे विलास चावरी यांना अवघ्या १४,१५६ मतांवर समाधान मानावे लागले होते. मनसेच्या तुषार आफळे यांना ३,११६ तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आसिफ भामला यांना २,३८७ मते मिळविण्यात यश आले होते. मधल्या पाच वर्षांत राजकीय परिस्थितीत आमूलाग्र बदल झाले असून, शेलार यांनी भाजपच्या मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी पेलताना दमदार कामगिरी केली. त्याचे फळ म्हणून त्यांची कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

शेलार अशा प्रकारे अधिक शक्तिमान होत असताना, विरोधकांमध्ये मात्र अस्तित्वाची लढाई देण्याची वेळ आली आहे. सिद्दीकी यांनी या मतदारसंघातून लढण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला असून, उमेदवारी अर्जदेखील भरलेला नाही. वांद्रे, पूर्व मधून ते त्यांचे चिरंजीव जीशान सिद्दीकी यांना उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सिद्दीकी वंचित आघाडीकडे जाण्याचे वृत्त आहे. मात्र, सध्या तरी त्यांनी त्याचा इन्कार केला आहे.

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत वांद्रे पश्चिम मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांना ६६,१११ मते मिळाली होती, तर भाजपच्या खासदार पूनम महाजन यांना ८१,६९६ मते मिळाली होती. वंचित बहुजन आघाडीच्या अब्दुल रहमान अंजारीया यांना केवळ ३३०२ मतांवर समाधान मानावे लागले होते.
 

मी या मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक नसून, काँग्रेस पक्षाच्या उमेदवारी अर्जदेखील भरलेला नाही. माझा मुलगा जीशान हा युवक काँग्रेसचा सरचिटणीस असून, त्याला वांद्रे पूर्व मतदारसंघातून लढण्याची इच्छा आहे. त्यासाठी मी तिकडे लक्ष देत आहे.
- बाबा सिद्दिकी, काँग्रेसचे माजी आमदार

Web Title: Congress awaits Big candidate to fight against Ashish Shelar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.