शाळा सोडण्यावरून गोंधळात गोंधळ; विद्यार्थी, पालकांची पाण्यातून पायपीट; सर्वत्र साचले तळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 15:15 IST2025-08-19T15:15:31+5:302025-08-19T15:15:57+5:30

पालिका शिक्षण विभागाच्या कारभारावर सर्व स्तरांतून टीकास्त्र

Confusion over school closures; Students, parents wade through water; ponds filled everywhere | शाळा सोडण्यावरून गोंधळात गोंधळ; विद्यार्थी, पालकांची पाण्यातून पायपीट; सर्वत्र साचले तळे

शाळा सोडण्यावरून गोंधळात गोंधळ; विद्यार्थी, पालकांची पाण्यातून पायपीट; सर्वत्र साचले तळे

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: रविवारी रात्रीपासून कोसळत असलेला पाऊस सोमवारीही सुरू असताना शिक्षण विभागाने शाळा भरवायच्या की नाहीत, याचा निर्णय वेळेत घेतला नाही. सकाळच्या सत्राच्या शाळांचे वर्ग कधी सोडायचे याचा वेळीच निर्णय झाला तर नाहीच, त्यात दुपारच्या सत्राचे विद्यार्थी शाळेत पोहोचत असताना सुटीची सूचना आली. त्यामुळे भर पावसात सकाळच्या सत्रातील मुलांचे व पालकांचे गुडघाभर पाण्यातून घरी जाताना हाल झाले. दुसरीकडे दुपारच्या सत्रातील मुले शाळेत आल्यानंतर आता एवढ्या पावसात घरी कसे जायचे, असा प्रश्न त्यांना पडला.

शिक्षण विभागाने रविवारी पूर्व सूचना दिली असती तर हे हाल झाले नसते, असे पालक आणि शिक्षकांनी सांगितले. हवामान विभागाने पावसाचा अलर्ट दिला असताना शिक्षण विभागाने तो गांभीर्याने घेतला नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. शिक्षक संघटनांनीही पालिकेच्या गोंधळावर नापसंती व्यक्त केली आहे.

'शाळांना सूचना नाही'

सकाळपर्यंत शाळांना कोणतीही सूचना मिळाली नाही. त्यामुळे अनेक पालक-मुलांना शाळेत घेऊन गेले. माटुंगा, कुर्ला, अंधेरी, कांदिवली, भांडुपसह अनेक भागांत रस्त्यांवर पाणी साचल्याने विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला, असे प्रहार शिक्षक संघटनेचे अध्यक्ष विकास घुगे यांनी सांगितले.

माझा मुलगा दहावीला शिकतो, पण पावसामुळे त्याला शाळेतून परत आणले. आधीच सुटी द्यायला हवी होती.
-लखन यादव, पालक, वरळी

सकाळपासून मुसळधार पाऊस होता. मुलांचे कपडे आणि दप्तर भिजले. त्यामुळे मी त्यांना अर्ध्या रस्त्यातून घरी आणले. आम्हाला रात्री जर कळवले असते, तर हाल नसते झाले.
-रुखसाना अन्सारी, पालक, कुर्ला

मी वरळी सिफेस पालिका शाळेत दहावीला शकतो. सकाळी शाळेत गेलो. पाऊस खूप होता. परंतु, पावसामुळे दुपारी घरी येणे अवघड झाले. मोठा भाऊ घ्यायला आला. सुटीची सूचना उशिरा मिळाली. दप्तर भिजले, कपडे भिजले. रस्त्यावर, शाळेच्या आजूबाजूला खूप पाणी भरले होते.
-अंकित यादव, विद्यार्थी, वरळी सी-फेस पालिका शाळा

मी आठवीत शिकतो. पावसामुळे रिक्षा रस्त्यातच अडकली. कसातरी शाळेत पोहोचलो. सगळीकडे पाणी भरलेले होते.
शाळेने दुपारी १२:४० पर्यंत मला थांबवून ठेवले. आई मला घ्यायला येईपर्यंत शाळेने सोडले नाही.
-श्राव्य काते, विद्यार्थी, मनोहर हरिराम चोगले विद्यालय, गोराई

 

Web Title: Confusion over school closures; Students, parents wade through water; ponds filled everywhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.