उद्धव ठाकरे हे बॉलीवूड माफियांचे लाडके; कंगना रनौतची मुख्यमंत्र्यांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2020 07:03 IST2020-09-10T01:26:11+5:302020-09-10T07:03:40+5:30

आज माझे घर तुटले, उद्या तुमचा अहंकार तुटेल

CM Uddhav Thackeray is the darling of Bollywood mafia; Kangana Ranaut criticizes the Chief Minister | उद्धव ठाकरे हे बॉलीवूड माफियांचे लाडके; कंगना रनौतची मुख्यमंत्र्यांवर टीका

उद्धव ठाकरे हे बॉलीवूड माफियांचे लाडके; कंगना रनौतची मुख्यमंत्र्यांवर टीका

मुंबई : महापालिका कर्मचाऱ्यांनी कार्यालयावर तोडक कारवाई केल्याने संतप्त झालेल्या अभिनेत्री कंगना रनौतने बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली. मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत ‘आज माझे घर तुटले, उद्या तुमचा अहंकार तुटेल’, काळाचा महिमा आहे, तो बदलत असतो, असे सांगतानाच बॉलीवूड माफिया आणि उद्धव ठाकरे यांचे गुळपीठ या निमित्ताने उघड झाल्याचा आरोप कंगनाने केला.

मुंबईत दाखल झाल्यानंतर कंगनाने आपल्या कार्यालयाची अवस्था व्हिडीओ टिष्ट्वटरवर पोस्ट करत ही लोकशाहीची हत्या असल्याचे म्हटले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांवर टीका करणारा व्हिडीओ पोस्ट केला. यात मुखमंत्री ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत, उद्धव ठाकरे तुम्हाला काय वाटते, फिल्म माफियांसोबत मिळून तुम्ही माझे घर पाडून मोठा बदला घेतला आहे. आज माझे घर तुटले आहे, उद्या तुझा अहंकार तुटेल. हे काळाचे चक्र आहे, लक्षात ठेवा हे नेहमीच सारखे नसते.

मला वाटते तुम्ही एकप्रकारे माझ्यावर खूप उपकार केले आहेत. कारण काश्मिरी पंडितांसोबत काय घडले याची मला माहिती होती, आज त्याचा मी अनुभव घेतला. आज मी देशातील जनतेला वचन देते की केवळ अयोध्येवरच नाही तर काश्मीरवरही एक चित्रपट बनवणार आहे. आणि माझ्या देशवासियांना जागे करणार आहे. कारण जे माझ्याबाबतीत घडले ते कुणासोबतही घडेल. उद्धव ठाकरे ही क्रुरता आणि दहशत माझ्यासोबत घडली हे चांगले झाले. जय हिंद, जय महाराष्ट्र!’ असे कंगनाने व्हिडीओत म्हटले.

यांना उघडे पाडल्याशिवाय राहणार नाही

बॉलीवूड माफिया आणि उद्धव ठाकरे यांच्यातील थेट संबंधच आजच्या प्रकरणाने उघड झाले आहेत. या कंपूने माझे घर आणि मलाही मारून टाकले, तरी यांना उघडे पाडल्याशिवाय राहणार नाही. अचानक माझे कार्यालय अनधिकृत बनले, २४ तासांत ते तोडले गेले. आता माझे घर पाडण्याची धमकी दिली जात आहे. बॉलीवूड माफियांचे लाडके असणारे, जगातले भारी मुख्यमंत्री म्हणून मिरविणाºया उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचे अंदाज यानिमित्ताने खरे ठरले, असे कंगनाने म्हटले आहे.

Web Title: CM Uddhav Thackeray is the darling of Bollywood mafia; Kangana Ranaut criticizes the Chief Minister