मध्य रेल्वे प्रवाशांना मिळाला दिलासा

By Admin | Updated: June 16, 2015 01:45 IST2015-06-16T01:45:05+5:302015-06-16T01:45:05+5:30

डीसी-एसी परावर्तनामुळे काही ठिकाणी असलेली वेगमर्यादा शिथिल केल्यानंतर आता हँकॉक ब्रीजजवळील वेगमर्यादाही शिथिल करण्याचा निर्णय

Central Railway passengers get relief | मध्य रेल्वे प्रवाशांना मिळाला दिलासा

मध्य रेल्वे प्रवाशांना मिळाला दिलासा

मुंबई : डीसी-एसी परावर्तनामुळे काही ठिकाणी असलेली वेगमर्यादा शिथिल केल्यानंतर आता हँकॉक ब्रीजजवळील वेगमर्यादाही शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ठिकाणी असलेली ताशी १५ किमी वेगमर्यादा आता ताशी ३0 किमी करण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे लोकल गाड्यांना होत असलेला लेटमार्क कमी होईल, अशी आशा मध्य रेल्वेकडून व्यक्त करण्यात आली आहे. रविवारपासून ही वेगमर्यादा आखून देण्यात आले आहे.
मध्य रेल्वे मार्गावर ठाणे ते सीएसटीपर्यंत डीसी ते एसी परावर्तन पूर्ण करण्यात आले. या परावर्तनाला परवानगी देताना रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून सीएसटी ते कुर्ला दरम्यान नऊ पुलांजवळ ताशी १५ किमीची वेगमर्यादा आखून देण्यात आली होती. त्यामुळे लोकल गाड्यांना लेटमार्क लागत होता. त्यानंतर रेल्वे बॉर्डाकडून चार ठिकाणी असलेली वेगमर्यादा न घालण्याचा निर्णय घेतला. तर उर्वरीत पाचपैकी चार ठिकाणी असलेली वेगमर्यादा ताशी १५ किमीवरुन ताशी ३0 ते ५0 किमीपर्यंत शिथिल करण्याचा निर्णय घेत प्रवाशांना दिलासा दिला. तरीही या वेगमर्यादेमुळे लोकल गाड्यांना होणारा लेटमार्क काही कमी होत नव्हता. लोकल तब्बल वीस मिनिटे उशिराने धावत असल्याने प्रवाशांना त्याचा फटका बसत होता. अखेर हँकॉक पुलाजवळ असणारी ताशी १५ किमी वेगमर्यादाही शिथिल करण्याचा निर्णय घेत ती ३0 किमी प्रतितास करण्यात आली. अप आणि डाऊन जलद मार्गासाठी हा नियम लागू असेल. (प्रतिनिधी)

Web Title: Central Railway passengers get relief