Campaign for candidates for North Indian votes | उत्तर भारतीय मतांसाठी उमेदवारांमध्ये चढाओढ
उत्तर भारतीय मतांसाठी उमेदवारांमध्ये चढाओढ

मुंबई : मतदारांना आकर्षित करण्यासाठी सेलिब्रिटींना प्रचारात उतरवण्याचा प्रकार नवीन नाही. परंतु, सायन-कोळीवाड्यात उत्तर भारतीय मतांसाठी भोजपुरीतील सुपरस्टार्सना मतदारसंघात आणण्याची चढाओढ भाजप आणि काँग्रेस उमेदवारामध्ये लागली आहे. भोजपुरी अभिनेतेही रोड शोमध्ये सामील होत असल्याने या मतदारसंघातील प्रचार फिल्मी स्टाइलने सुरू आहे.


सायन कोळीवाडा मतदारसंघात बहुसंख्य मतदार दक्षिण भारतीय आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये उत्तर भारतीय मतदारांची संख्याही ३५ ते ४० हजारपर्यंत पोहोचली आहे. या मतदारांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, याची जाणीव उमेदवारांना झाली आहे. या मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार विद्यमान आमदार तमिळ सेल्वन निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे मुंबई युवा अध्यक्ष गणेश यादव मैदानात आहेत. एकूण ११ उमेदवार या मतदारसंघातून निवडणूक लढवत असले तरी खरी लढत भाजप आणि काँग्रेसमध्येच रंगणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे दक्षिण भारतीय मतदारांनंतर उत्तर भारतीय मते मिळविण्यासाठी दोन्ही उमेदवारांची धावपळ सुरू आहे.


तमिळ सेल्वन यांनी आपल्या प्रचारात भोजपुरी सुपरस्टार दिनेश लाल यादव (निरुवाह) यांना गेल्या आठवड्यात आणले होते. त्यांच्या रोड-शोला मतदारांचा प्रतिसाद मिळाल्यामुळे काँग्रेसचे उमेदवार गणेश यादव यांनी सायन-कोळीवाड्यात प्रचारासाठी भोजपुरीतील प्रसिद्ध अभिनेते खेसारी लाल यादव यांना आणून मतदारांची मनं जिंकण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी सेल्वन यांनी दिल्लीतील भाजप अध्यक्ष, खासदार आणि भोजपुरी सुपरस्टार मनोज तिवारी यांचा रोड-शो सोमवारी आयोजित केला होता. भोजपुरी भाषेत खास गीतही रचण्यात आले आहे. या चढाओढीत यादव यांनी आता थेट सुप्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांना प्रचारासाठी आणण्याची तयारी सुरू केली आहे.

एकूण मतदार - दोन लाख ६० हजार मतदार
च्२०१४ मध्ये ५२ टक्के मतदान झाले होते.
पक्ष... उमेदवार... मिळालेली मतं
भाजप - तमिळ सेल्वन - ४०,८६९
शिवसेना - मंगेश सातमकर - ३७,१३१
काँग्रेस - जगन्नाथ शेट्टी - २३,१०७

Web Title: Campaign for candidates for North Indian votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.