मुंबईतील नालेसफाई; ३१ कंत्राटदार, २५० कोटींचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 10:15 AM2024-03-28T10:15:02+5:302024-03-28T10:16:02+5:30

मेपर्यंत १० लाख मेट्रिक टन काढणार गाळ.

bmc tender for drain cleaning in mumbai 31 contractors costing rs 250 crores | मुंबईतील नालेसफाई; ३१ कंत्राटदार, २५० कोटींचा खर्च

मुंबईतील नालेसफाई; ३१ कंत्राटदार, २५० कोटींचा खर्च

मुंबई : ‘नेमेचि येतो पावसाळा’ म्हणत नालेसफाईला पालिकेकडून सुरुवात केली आहे. शहर, उपनगरात छोट्या-मोठ्या नाल्यांतील तसेच द्रुतगती महामार्गालगतचे नाले, मिठी नदीतील गाळ उपसा करण्याची जबाबदारी पालिकेने ३१ कंत्राटदारांवर सोपविली आहेत. यासाठी पालिका २४९.२७ कोटी खर्च करणार आहे. 

मुंबईत छोटे नाले, मोठे नाले आणि रस्त्यालगतच्या जलवाहिन्या, पाणी निचरा होण्याच्या ठिकाणांमध्ये येणारी माती, घाण, कचरा, गाळामुळे अनेकवेळा भरल्याचे प्रकार घडतात. छोटे नाले व रस्त्यालगतच्या पर्जन्य जलवाहिन्यांमधून सांडपाणी, काही प्रमाणात गाळ वाहून नेला जातो. मात्र, छोट्या नाल्यांचा काही भाग भरती-ओहोटी भागात येत असल्यामुळे पाण्याचा निचरा न होता गाळ साचून राहतो. त्यामुळे अतिवृष्टीत या नाल्यांचे पाणी शहरात घुसण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे पावसाळ्याआधी नालेसफाईची कामे हाती घेतली जातात. दरवर्षी मार्चच्या सुरुवातीला होणारी नालेसफाई यंदा उशिराने सुरू झाल्याने कंत्राटदारांना ३१ मेपूर्वी १० लाख २२ हजार १३१ मेट्रिक टन गाळ उपसा करावा लागणार आहे.

निवडणूक ड्युटीचा परिणाम-

लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी पालिकेचे ५० हजारांहून अधिक मनुष्यबळ जाणार आहे. त्यामुळे नालेसफाईसह सर्वच कामांवर देखरेख ठेवण्यासाठी पालिकेला कसरत करावी लागणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. देखरेखीसाठी मनुष्यबळाबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.

पालिकेची कसरत -

१) २०२२ वर्षात नालेसफाई ११ एप्रिल रोजी सुरू झाली होती. यावेळी काम पूर्ण करताना पालिकेला मोठी कसरत करावी लागली होती.
 
२) तर २०२३ मध्ये ६ मार्चपासून नालेसफाईचे काम सुरू करण्यात आले होते. 

३) मात्र, यावर्षी तिसऱ्या आठवड्यानंतर काम सुरू झाल्यामुळे पालिकेने वेगाने काम करून टार्गेट गाठण्याचे आव्हान पालिकेसमोर राहणार आहे. 

४) दरम्यान, मिठी नदीचे काम सुरू झाले असून ३० टक्के काम पूर्ण झाले आहे.

नालेसफाई           शहर    पूर्व उपनगरे    पश्चिम उपनगरे          खर्च 

मोठे नाले                  १             २                    ३                       ९१. ६२ कोटी 
द्रुतगती महामार्ग      ०             २                      ३                      १४. २० कोटी 
छोटे नाले                 २            ६                     ९                       १०२. ०३ कोटी 
मिठी नदी                ०            ३                      ०                       ४१. ४१ कोटी 
एकूण                      ३            १३                    १५                     २४९. २७ कोटी

Web Title: bmc tender for drain cleaning in mumbai 31 contractors costing rs 250 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.