“राज ठाकरे जे बोलले, त्यासाठी हिंमत लागते, गौतम अदानी...”; संजय राऊतांची भाजपावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 13:45 IST2026-01-13T13:43:49+5:302026-01-13T13:45:21+5:30
Sanjay Raut News: मुंबईत यापुढे विमानतळ नसेल, कारण ते आंतरराष्ट्रीय शहर आहे ना, मुंबई विमानतळाचा भूखंड अदानीला देणार आहेत, असा दावा संजय राऊतांनी केला.

“राज ठाकरे जे बोलले, त्यासाठी हिंमत लागते, गौतम अदानी...”; संजय राऊतांची भाजपावर टीका
Sanjay Raut News: राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२६ साठी मतदान होत आहे. यानंतर लगेचच १६ जानेवारी रोजी मतमोजणी आहे. मुंबई मनपा निवडणुकीकडे संपूर्ण राज्यासह अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. ठाकरे बंधू आणि भाजपा-शिंदेसेनेसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरत आहे. यातच गौतम अदानी यांच्या प्रकल्पांवरून राज ठाकरे यांनी आकेडवारी दाखवत टीका केली होती. यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना समर्थन देत भाजपावर टीका केली आहे.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, राज ठाकरेंनी सांगितले, माझ्या घरी कोणी आला, जरी तो माझा मित्र असेल तरी मी त्यांची पापे झाकणार नाही. त्यांची पापे उघडी करेन. त्यासाठी हिंमत लागते. भाजपासोबत जे लोक आले आहेत, त्यांचा भ्रष्टाचार उघडा करण्याची हिंमत आहे का? ती हिंमत असेल तर त्यांनी बोलावे. गौतम अदानी हा तुमचा बाप झाला आहे. आता त्या बापासमोर तुम्ही थरथरत आहात. मुंबईत यापुढे विमानतळ नसेल, कारण ते आंतरराष्ट्रीय शहर आहे ना, मुंबई विमानतळाचा भूखंड अदानीला देणार आहेत, असा दावा संजय राऊतांनी केला.
जिथे बोगस मतदार आढळतील तिथे आमचे कार्यकर्ते...
मुंबईत बोगस मतदारांना फटकावण्याची सुरूवात झाली आहे. जे पैसे वाटत आहेत, त्या भाजपाच्या लोकांना शिंदेंचे लोक ठोकतायेत आणि शिंदेंच्या लोकांना भाजपाचे लोक ठोकतायेत. आम्ही ते आउटसोर्सिंग केले आहे. दुबार मतदारांना ठोकण्याची सुरूवात सकाळी सातपासून सुरू होईल. जिथे बोगस मतदार आढळतील तिथे आमचे कार्यकर्ते जाऊन त्यांना ठोकतील, असा इशारा संजय राऊतांनी दिला.
दरम्यान, उद्या दाऊद मुंबईत आला तर भाजपा त्यालाही उमेदवारी देईल. छोटा शकील, अबू सालेम यांनाही तुम्ही तुमच्या पक्ष कार्यालयात बोलावून उमेदवारी द्याल. अशा प्रकारचे राजकारण भाजपाचे चालू आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या विकासावर, भविष्यावर बोलले पाहिजे. ते किरकोळ गोष्टींवर बोलत आहेत, या शब्दांत संजय राऊतांनी हल्लाबोल केला.