७०० चौ. फूट घरांना मालमत्ता करमाफी, पाणीपुरवठा मोफत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 11:15 IST2026-01-08T11:15:39+5:302026-01-08T11:15:39+5:30
अजित पवार गटाने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात ७०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याबरोबरच पायाभूत सुविधा आणि विकास यावर भर देण्यात आला आहे.

७०० चौ. फूट घरांना मालमत्ता करमाफी, पाणीपुरवठा मोफत
मुंबई : अजित पवार गटाने बुधवारी जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात ७०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याबरोबरच पायाभूत सुविधा आणि विकास यावर भर देण्यात आला आहे. त्याचबरोबर जुन्या चाळी आणि झोपडपट्टीमध्ये २४ तास मोफत पाणी पुरवठ्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
प्रत्येक विभागात प्रगत प्राथमिक आरोग्य केंद्र, मोफत वैद्यकीय तपासणी करण्याचेसुद्धा यात नमूद करण्यात आले आहे. महापालिका शाळांचे आधुनिकीकरण, डिजिटल क्लासरूम आणि मोफत पौष्टिक आहार योजना, स्मार्ट वर्गखोल्या आणि एआय तंत्रावर आधारित शाळांचे व्यापक डिजिटलायझेशन, सुसज्ज ग्रंथालये आणि वॉर्ड तिथे मोफत अभ्यासिकांसह करिअर मार्गदर्शन केंद्रांची स्थापना, माध्यमिक स्तरावर व्यावसायिक प्रशिक्षणासाठी उद्योगांशी भागीदारी करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
...तरीही विरोधक प्रभावी नाहीत : सुनील तटकरे
राज्यात सत्तेत सहभागी असलेले घटक पक्ष एकमेकांविरोधात निवडणूक लढवत असले, तरी विरोधी पक्ष मात्र आपली भूमिका प्रभावीपणे मांडताना दिसत नाहीत, असा टोला राष्ट्रवादी (अजित पवार)चे कार्याध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी बुधवारी ठाण्यात लगावला. कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली पाटील-चाकणकर, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला उपस्थित होते. पुढे म्हणाले, ‘२०१७ मध्ये राजकीय परिस्थिती वेगळी होती. तेव्हा विरोधी पक्षात होतो. मात्र, आज अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या हितासाठी आम्ही एनडीएसोबत आहोत. तरीही आमची भूमिका धर्मनिरपेक्षतेचीच आहे.’