BMC Election 2026: ...तर १६ तारखेनंतर 'जय श्रीराम' म्हणता येणार नाही; नितेश राणेंचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 13:38 IST2026-01-11T13:37:25+5:302026-01-11T13:38:57+5:30
Nitesh Rane on Uddhav Thackeray and Raj Thackeray: शिवडी येथील महायुतीच्या प्रचार सभेत आमदार नितेश राणे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. हिंदुत्व, मराठी माणूस आणि मुंबईच्या अस्मितेवरून त्यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार निशाणा साधला.

BMC Election 2026: ...तर १६ तारखेनंतर 'जय श्रीराम' म्हणता येणार नाही; नितेश राणेंचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल!
शिवडी येथील महायुतीच्या प्रचार सभेत आमदार नितेश राणे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. हिंदुत्व, मराठी माणूस आणि मुंबईच्या अस्मितेवरून त्यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार निशाणा साधला. "जर हिंदुत्वाचा खरा गड कोणता असेल, तर सर्वात आधी शिवडी आणि लालबागचे नाव घेतले जाईल. मात्र, इथून हाकेच्या अंतरावर असलेल्या भायखळ्यात जाऊन पहा, तिथे आपल्याला 'जय श्रीराम' म्हणता येते का?" अशा बोचऱ्या शब्दांत भाजपा आमदार नितेश राणे यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
मराठी माणसाच्या हद्दपारीला जबाबदार कोण?
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधूंनी पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा उपस्थित केल्यावरून नितेश राणे यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले, "उद्धव ठाकरेंना आताच मराठीचा पुळका का आला? गेली अनेक वर्षे मुंबईत तुमची सत्ता होती, मग या काळात मराठी माणूस मुंबईबाहेर का फेकला गेला? याचे उत्तर त्यांनी द्यावे." केवळ सत्तेसाठी मराठीच्या मुद्द्याचा वापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
१६ तारखेचा इशारा आणि अस्तित्वाची लढाई
मतदारांना सतर्क राहण्याचे आवाहन करताना राणे म्हणाले की, "जर आपण आता सतर्क राहिलो नाही, तर १६ तारखेपासून आपल्याला 'जय श्रीराम' म्हणणेही कठीण होईल. आपले अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल, तर ही लढाई गांभीर्याने घ्यावी लागेल."
बाळासाहेबांची स्वप्ने मोदींनी पूर्ण केली
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलेली स्वप्ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्यक्षात उतरवली आहेत, असेही राणे यांनी नमूद केले. "बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार म्हणवून घेणाऱ्यांनी केवळ सत्ता पाहिली, पण मोदींनी त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम केले आहे," असे ते म्हणाले. दरम्यान, शिवडी विधानसभेच्या विकासासाठी आणि हिंदूंच्या अस्तित्वासाठी महायुतीच्या उमेदवारांना, म्हणजेच कमळ चिन्हासमोरील बटण दाबून निवडून देण्याचे आवाहन नितेश राणे यांनी या सभेत केले.