“आमचे क्रेडिट चोरणारी बोलबच्चनांची टोळी मुंबईत”; CM फडणवीसांनी घेतला ठाकरे बंधूंचा समाचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 06:09 IST2026-01-04T06:08:10+5:302026-01-04T06:09:23+5:30
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, देखकर धुंधलीसी ताकद हौसला हमारा कम नही होता. झुठी आंधीसे वह डरे जिन चिरागोंमे दम नही होता.

“आमचे क्रेडिट चोरणारी बोलबच्चनांची टोळी मुंबईत”; CM फडणवीसांनी घेतला ठाकरे बंधूंचा समाचार
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : इतकी वर्षे त्यांनी भ्रष्टाचार, अनाचार आणि दुराचार एवढेच करून दाखविले, आम्ही काय केले त्याची स्मारके मुंबईत जागोजागी दिसत आहेत. तरीही आमचे क्रेडिट चोरणारी बोलबच्चनांची टोळी मुंबईत फिरत आहे असे जोरदार टीकास्र उद्धव ठाकरेंवर सोडतानाच, आता मुंबईत महायुतीचीच सत्ता येणार असून आम्ही एकाही मराठी माणसावर मुंबई सोडून जाण्याची पाळी येऊ देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली.
भाजप-शिंदेसेनेच्या वतीने वरळीच्या एनएससीआय डोममध्ये प्रचार प्रारंभाच्या मेळाव्यात ते बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, मंत्री आशिष शेलार, नितेश राणे, योगेश कदम, मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम, रामदास कदम आदी नेते उपस्थित होते. दोघे भाऊ एकत्र आले आता कसे लढणार असे पत्रकारांनी मला विचारल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, देखकर धुंधलीसी ताकद हौसला हमारा कम नही होता. झुठी आंधीसे वह डरे जिन चिरागोंमे दम नही होता.
‘टेंडर तिथे सरेंडर, हे तर करप्शनसम्राट’
टेंडर आले की ते सरेंडर व्हायचे, ते कसले कार्यसम्राट, ते तर करप्शनसम्राट. त्यांचा ‘म’ मलिद्याचा, मतलबाचा आणि मुजोरीचा आहे. आहे, आमचा ‘म’ मराठीचा, महायुतीचा आहे, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री आणि शिंदेसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यावर या मेळाव्यात बोलताना केला.
शिंदे यांनी नाव न घेता ठाकरेंवर सडकून टीका केली. ते म्हणाले, तुम्ही अस्मिता विकली. ज्या काँग्रेसने बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला त्या काँग्रेसच्या मांडीवर बसलात. आता त्यांनीही लाथ मारली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याचे पुण्य आम्हाला मिळाले. यांचा मराठी भाषेचा पुळका खोटा आहे. त्यांना पुळका फक्त महापालिकेच्या तिजोरीचा आहे, अशी टीकाही शिंदे यांनी यावेळी केली.