वांद्रे पश्चिमेत तगडी चुरस; भाजपविरोधात काँग्रेस, ठाकरे बंधू, मंत्री आशिष शेलार यांच्यापुढे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 10:40 IST2026-01-10T10:37:20+5:302026-01-10T10:40:48+5:30
तेथील प्रभागांमध्ये भाजप, ठाकरे बंधू व काँग्रेस यांच्यात प्रमुख लढती होत आहेत.

वांद्रे पश्चिमेत तगडी चुरस; भाजपविरोधात काँग्रेस, ठाकरे बंधू, मंत्री आशिष शेलार यांच्यापुढे आव्हान
खलील गिरकर लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महापालिकेच्या प्रभागांची निवडणूक स्थानिक आमदार व राज्याचे सांस्कृतिक मंत्री, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मुंबई भाजपचे निवडणूक प्रभारी आशिष शेलार यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. तेथील प्रभागांमध्ये भाजप, ठाकरे बंधू व काँग्रेस यांच्यात प्रमुख लढती होत आहेत.
वांद्रे विधानसभेतील प्रभागांत मध्यमवर्गीय व उच्चभ्रू वस्ती, झोपडपट्टी परिसराचा समावेश आहे. उच्चभ्रू नागरिक, अभिनेत्यांची निवासस्थाने असल्याने येथील लढतींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रभाग क्र. ९७ ते १०२ मध्ये भाजपचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत, यासाठी शेलार प्रयत्नशील आहेत.
या सहापैकी तीन प्रभागांमध्ये २०१७च्या पालिका निवडणुकीत भाजपचे उमेदवार विजयी झाले होते, तर उर्वरित प्रभागांमध्ये अपक्ष, काँग्रेस व शिवसेनेचे प्रत्येकी एक उमेदवार निवडून आले होते. २०१७ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या हेतल गाला, अलका केरकर व स्वप्ना म्हात्रे यांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिली आहे.
प्रचाराला वेग, विरोधकांचीही मोर्चेबांधणी
९७ ते १०२ या प्रभागांमध्ये प्रचाराला वेग आला असून, विरोधी पक्षांनीही चांगली मोर्चेबांधणी केली आहे. प्रभागनिहाय बैठका, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, नागरिकांशी थेट संवाद, विकासकामांचे श्रेय आणि प्रलंबित प्रश्न या मुद्द्यांवर प्रचार रंगताना दिसत आहे. अनेक ठिकाणी घरोघरी भेटी, सोसायट्यांमध्ये बैठका, छोट्या सभा आणि सोशल मीडियाद्वारे प्रचाराचा जोर वाढला आहे.
भाजपकडून विकासकामांचा दाखला दिला जात आहे. तर, विरोधकांकडून 'महापालिकेतील कारभार आणि स्थानिक समस्यांवरून' आक्रमक भूमिका घेतली जात आहे. प्रभागातील जातीय व सामाजिक समीकरणे, नाराज घटक, याचा अभ्यास करून रणनीती आखली जात आहे. काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत चांगली मते मिळाल्याने त्याचा लाभघेण्याचा प्रयत्न केला जात आहे.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील मते
२०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आशिष शेलार ८२ हजार ७८० मते मिळवून विजयी झाले. तर, काँग्रेसचे आसिफ झकेरिया दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यांना ६२ हजार ८५० मते मिळाली होती.
प्रभागनिहाय लढतीचा वेध
प्रभाग क्र. ९७ मध्ये भाजपच्या हेतल गाला, उद्धवसेनेच्या ममता चव्हाण आणि काँग्रेसच्या गौरी छाबडिया यांच्यात सामना आहे.
प्रभाग क्र. ९८ मध्ये मनसेच्या दीप्ती काणे, भाजपच्या अलका केरकर, वंचितचे सुदर्शन येलवे रिंगणात आहेत.
प्रभाग क्र. ९९ मध्ये उद्धवसेनेचे चिंतामणी निवाटे, भाजपचे जितेंद्र राऊत, काँग्रेसच्या सुनीता वावेकर यांच्यात लढत आहे.
प्रभाग क्र. १०० मध्ये भाजपच्या स्वप्ना म्हात्रे, उद्धवसेनेच्या साधना वरसकर, काँग्रेसच्या नीदा शेख रिंगणात आहेत.
प्रभाग क्र. १०१ मध्ये भाजपच्या अनुश्री घोडके, उद्धवसेनेच्या अॅड. अक्षता मेनेझेस, काँग्रेसच्या कॅरन डिमेलो यांच्यात लढत आहे.
प्रभाग क्र. १०२ मध्ये काँग्रेसचे राजा रेहबर खान, मनसेचे आनंद हजारे, राष्ट्रवादी (अजित पवार) चे जाहीद खान, भाजपचे निलेश हंडगर रिंगणात आहेत.