सुधीर मुनंगटीवार यांनी घेतली CM देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले, नाराजी दूर होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 11:24 IST2025-12-24T11:23:21+5:302025-12-24T11:24:56+5:30
BJP Sudhir Mungantiwar News: स्वपक्षावरच नाराज असलेल्या माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली.

सुधीर मुनंगटीवार यांनी घेतली CM देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले, नाराजी दूर होणार?
BJP Sudhir Mungantiwar News: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मंत्रिमंडळात समावेश न झालेले भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने स्वपक्षालाच घरचा अहेर देताना पाहायला मिळत आहे. अनेक मुद्द्यांवरून महायुती सरकारलाच कात्रीत पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. नगर परिषदा आणि नगर पंचायत निवडणूक निकालांनंतरही सुधीर मुनगंटीवार यांनी आपली नाराजी बोलून दाखवली होती. यानंतर आता सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. रात्री उशिरा ही भेट झाली.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथील वर्षा निवासस्थानी भेट घेऊन विविध विकासात्मक विषयांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी शेतकऱ्यांना धानाचा प्रति हेक्टर २० हजार बोनस, आधारभूत धान खरेदी नोंदणीची अंतिम तारीख ३१ जानेवारीपर्यंत वाढविणे, अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती नुकसानीसाठी विशेष बाब म्हणून ३ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रधारक शेतकऱ्यांना मदत, तसेच बल्लारपूर येथे ईएसआयसी रुग्णालय, राज्य राखीव पोलीस बल व महिला सहकारी औद्योगिक वसाहतीसाठी मौजा विसापूर येथील बंद असलेल्या पावर हाऊसची ३१.३५ हेक्टर मधील जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात तसेच आदी विषयांवर आग्रही मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व मागण्यांना अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ कार्यवाहीचे स्पष्ट निर्देश दिले. शेतकरी बांधवांच्या हितासाठी आणि आरोग्यविषयक महत्त्वाच्या प्रश्नांसाठी दाखवलेल्या या संवेदनशील व दूरदर्शी भूमिकेबद्दल त्यांचे मनस्वी आभार, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी एक्सवर पोस्ट करून दिली.
मुनगंटीवारांची नाराजी अन् मुख्यमंत्री फडणवीसांचे आश्वासन
चंद्रपूर येथील निकालांवर बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते की, आम्हा सर्वांना चिंतन करावे लागेल. काँग्रेसने वडेट्टीवारांना महाराष्ट्राचा नेता केले आणि दुसरीकडे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना एकही मंत्रिपद दिले नाही. मला तर दिलेच नाही, पण कोणालाही मंत्रिपद दिले नाही. ज्या पद्धतीने आम्ही दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश देत आहोत याचा परिणाम मतदारांवर नक्कीच होणार आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना, सुधीरभाऊंना ताकद कमी पडली तर भरपाई देऊ, असे आश्वासन दिले होते.
दरम्यान, मंत्रिपद न मिळाल्याने सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्यानंतर आता सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीत सुधीर मुनगंटीवार यांची नाराजी दूर झाली का? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.