“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 13:08 IST2025-08-20T13:07:51+5:302025-08-20T13:08:50+5:30
Best Employees Cooperative Credit Society Election 2025 Result: मुंबई महापालिका कुणाच्या ताब्यात येणार, याचा स्पष्ट कौल बेस्ट निवडणुकीतून मिळाला असल्याचे भाजपा नेत्यांनी म्हटले आहे.

“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
Best Employees Cooperative Credit Society Election 2025 Result: मुंबईतील बहुचर्चित बेस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे गट-मनसे यांच्या ‘उत्कर्ष पॅनेल’चा दारुण पराभव झाला. या निवडणुकीत शशांक राव पॅनेलने सर्वाधिक १४ जागा जिंकून मोठे यश मिळवले आहे. महायुती प्रणित सहकार समृद्धी पॅनेलने ७ जागांवर विजय मिळवला. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक लिटमस टेस्ट मानली जात होती. त्यामुळे एकही जागा निवडून न आलेल्या ठाकरे बंधूंच्या युतीला या पराभवामुळे मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. यावरून आता भाजपा नेत्यांनी ठाकरे ब्रँडवर निशाणा साधला.
ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
बेस्ट निवडणूक ईव्हीएम (EVM) मशीनवर झाली नाही, तर बॅलेट पेपरवर झाली. ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला. लोकशाही च्या नावे गळा काढणारे राउत आता पराभव मान्य करणार का? मुंबई महापालिका कुणाच्या ताब्यात येणार आणि आम्ही देणार, असा स्पष्ट कौल बेस्ट निवडणुकीतून मतदारांनी दिला. मताची चोरी, असा अरोप करणाऱ्या राहुल गांधी यांनी बेस्ट निवडणुक निकालावर बोलावे. कोणी बंधू एकत्र आले तर येऊ द्या, रक्ताची नाती सुखाने जीवाभावे नांदावी हीच भाजपाची कौटुंबिक संस्कृती आणि विचार. आम्ही राजकारण सामान्य जनतेच्या कल्याणासाठी करतो. त्यामुळे कोणी बंधू एकत्र आले तर महायुतीला काही फरक पडत नाही हेच बेस्ट निवडणूक निकालातून प्रत्यक्ष दिसून आले, या शब्दांत भाजपा प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी हल्लाबोल केला.
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
मुंबईकरांचा आशीर्वाद हिंदुत्वाच्या स्टॅण्डला, ठाकरे बंधूंचे टायर बेस्ट निवडणुकीत पंक्चर
बेस्ट पतपेढी निवडणुकीत भाजपप्रणीत पॅनल आणि शशांक राव यांना मोठा विजय मिळाला आहे. या निकालातून स्पष्ट झाले की, मुंबईकरांचा आशीर्वाद डुप्लिकेट ब्रँडला नाही तर बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या खऱ्या स्टॅण्डला आहे, असे भाजप प्रदेश माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी म्हटले आहे. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत उबाठाचा पूर्ण पराभव झाला. यावर संजय राऊत आधी “मुंबईत आमचाच ब्रॅंड चालणार”, अशी पोपटपंची करत होते. पण आता निकाल लागल्यानंतर त्यांची दातखिळी बसली आहे. नेहमीप्रमाणे “EVM, व्होट चोरी” असे खोटे आरोप करण्याचा मुद्दाही त्यांच्याकडे उरलेला नाही. बेस्टच्या निवडणुकीत मुंबईकरांनी थेट मतदानातून ठाकरे गटाचा धुव्वा उडवला आहे. यापुढे मुंबईत केवळ हिंदुत्वाचा ब्रँड विजयी होईल, डुप्लिकेट ब्रँड नाही हे या निकालातून अधोरेखित झाले आहे.
दरम्यान, बेस्ट पतपेढीची निवडणूक पक्षीय पातळीवर घेऊ नये, असे आमचे मत होते. मात्र सहकारातून स्वाहाकार करणाऱ्यांनी ती निवडणूक राजकारणात ओढली. बेस्ट कर्मचाऱ्यांनी ठाकरे गटाला ठोसा मारून चपराक दिली आहे. महापालिकेत हिंदुत्वाचा स्टॅण्ड कायम राहील, हे बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपल्या मतदानातून दाखवून दिलं आहे. प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली मिळालेला हा विजय महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा आहे.