Join us

'...मग प्रॉब्लेम काय?, उद्याच निर्णय जाहीर करा बस्स'; पंकजा मुंडेंचा संताप  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 15:58 IST

तब्बल १५ दिवस ते एका ठिकाणी आहेत. कुणी साधा शिंकलाही नाही.

मुंबई: लॉकडाऊनमुळं घरापासून दूर अडकून पडलेल्या व अनेक अडचणींचा सामना करणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या बिकट परिस्थितीकडं भाजपच्या नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी सरकारचं लक्ष वेधलं आहे. ऊसतोड कामगारांना लवकरात लवकर घरी पाठवण्याची सोय झाली पाहिजे अशी तीव्र भावना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

पंकजा मुंडे ट्विट करत म्हणाल्या की, इथे लेकरांच्या जेवणात चिखल, कुडं पडली, धान्य भिजलंय. आज अन्न गेलं नाही गळ्याखाली! बिचारे मजूर आयसोलेशनने आजारी पडतील. सर्व शिस्त पाळून, कष्ट करून त्यांच्या ताटात माती? ते हॉटस्पॉट मध्ये नाहीत न हॉटस्पॉटला जाणार आहेत मग काय प्रॉब्लेम असा सवालही पंकजा मुंडे यांनी सरकारला विचारला आहे. तसेच उद्याच्या उद्या ऊसतोड कामगारांबाबत सरकारने निर्णय जाहीर करावा अशी मागणी देखील पंकजा मुंडे यांनी केली आहे.

ऊसतोड कामगारांसाठी पंकजा मुंडे सातत्यानं आवाज उठवत आल्या आहेत. याआधीही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी या कामगारांच्या संदर्भात चर्चा केली होती. तसंच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही लिहिलं होतं. सध्या लॉकडाऊनमुळं अनेक कामगार घरापासून दूर असून आयसोलेशन कॅम्पमध्ये राहत आहेत. मात्र, अवकाळी पावसामुळं त्यांचे हाल होत आहेत. तब्बल १५ दिवस ते एका ठिकाणी आहेत. कुणी साधा शिंकलाही नाही. मग चिंता कसली आहे? आम्हाला श्रेय नको पण निर्णय घ्या, असं ट्विट देखील पंकजा मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी केलं होतं.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसपंकजा मुंडेभाजपामहाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकारउद्धव ठाकरे