भाजपाच्या आमदाराने घेतली राज ठाकरेंची भेट; 'कृष्णकुंज'वरील भेटीनंतर चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 15:56 IST2020-03-01T15:48:06+5:302020-03-01T15:56:44+5:30
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मनसे आणि भाजपातील जवळीक वाढू लागली आहे.

भाजपाच्या आमदाराने घेतली राज ठाकरेंची भेट; 'कृष्णकुंज'वरील भेटीनंतर चर्चांना उधाण
मुंबई: मनसेने मराठीसोबतच हिंदुत्वाचा झेंडाही खांद्यावर घेतल्यानंतर महाराष्ट्रात मनसे व भाजपा या दोन पक्षांमधील जवळीक अधिकच वाढत चालली असून आज पुन्हा भाजपाचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी कृष्णकुंज निवासस्थानी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. तासभर चाललेल्या या चर्चेनंतर मनसे- भाजपा युतीची पुन्हा नव्याने चर्चा रंगू लागल्या आहे.
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मनसे आणि भाजपातील जवळीक वाढू लागली आहे. पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोरांविरुद्धच्या मनसेच्या मोर्चा आधीदेखील आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रभादेवी येथील इंडिया बुल्स स्काय येथे राज ठाकरेंची गुप्त भेट घेतली होती. त्यामुळे भाजपाचे नेते राज ठाकरेंशी नेमक्या मुद्यांवर चर्चा करत आहे हे मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे.
दरम्यान, शिवसेना-भाजप युती तुटली असतानाच मनसेने अचानक हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील या बदलत्या राजकीय स्थितीत हिंदुत्वाची कास धरणारा मनसे हा पक्ष आपला नवा मित्र होऊ शकतो, असे भाजपला वाटत आहे. भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यासह सुधीर मुनगंटीवार यांनी देखील मनसेच्या हिंदुत्वाच्या भूमिकेचं स्वागत करत मनसे आणि भाजपा युतीचे संकेत दिले होते. त्यामुळे आगामी 2022 मधील मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसे आणि भाजपा एकत्र येऊन नवीन समीकरण तयार करणार का हे येणाऱ्या काळातच समोर येणार आहे.