फुकट प्रवास नको रे बाबा....; एका दिवसात फुकट्या प्रवाशांना ५८ हजार दंड

By सीमा महांगडे | Published: January 5, 2024 03:12 PM2024-01-05T15:12:58+5:302024-01-05T15:13:26+5:30

३८२ तिकीट निरीक्षकांची नेमणूक

best bus 58 000 fine on free passengers in one day | फुकट प्रवास नको रे बाबा....; एका दिवसात फुकट्या प्रवाशांना ५८ हजार दंड

फुकट प्रवास नको रे बाबा....; एका दिवसात फुकट्या प्रवाशांना ५८ हजार दंड

सीमा महांगडे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यामंधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या तसेच खरेदी केलेल्या तिकिटाने प्रमाणित केलेल्या अंतरापेक्षा जास्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध बेस्ट उपक्रमाने विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी बेस्ट उपक्रमाने मुंबईच्या गर्दीच्या बसस्थानकांवर अतिरिक्त तिकीट निरीक्षकांची नेमणूक केली आहे. बेस्टने नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे २ जानेवारी रोजी एकूण ९४५ प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून ५८,४५७ दंड वसूल केला आहे. या मोहिमेंतर्गत बेस्ट उपक्रमाच्या उत्पन्नात प्रतिदिन ८ पट पेक्षा जास्तीने वाढ झाली आहे.

सध्या बेस्ट उपक्रमाकडून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून देय असलेले प्रवास भाडे, अधिक प्रवासी भाड्याच्या रकमेच्या दहापट एवढी रक्कम दंड म्हणून आकारण्यात येते. हा दंड भरण्याचे नाकारल्यास मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या कलम ४६० अन्वये एक महिन्यापर्यंत वाढवता येईल इतक्या कारावासाची किंवा २०० रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा एकत्रितपणे देण्याची तरतूद आहे.

बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांमध्ये दररोज ३२ ते ३५ लाखांपर्यंत प्रवासी प्रवास करतात. बस प्रवाशांची संख्या वाढत असताना दुसऱ्या बाजूला याच गर्दीतून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असून उत्पन्नात घट होत असल्याचे बेस्ट प्रशासनाच्या निदर्शनास आले.

३८२ तिकीट निरीक्षकांची नेमणूक

बेस्ट उपक्रमाने २०२४ वर्षाच्या सुरुवातीपासून विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवली असून याकरता बेस्ट उपक्रमातर्फे अतिरिक्त तिकीट निरीक्षकांची मुंबईच्या विविध भागांतील गर्दीच्या ठिकाणातील बसस्थानकांवर नेमणूक करण्यात आली आहे. या अंतर्गत बेस्ट उपक्रमातर्फे विशेष पथके तयार करण्यात आली असून या पथकामध्ये एकूण ३८२ निरीक्षकांची तिकीट तपासणी करता मुंबईच्या वेगवेगळ्या गर्दीच्या ठिकाणी नेमणूक करण्यात आली आहे. या मोहिमेत मंगळवार, २ जानेवारी रोजी तब्बल ९४५ विना तिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे एका दिवसात ५८,४५७ रुपये इतका दंड वसूल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Web Title: best bus 58 000 fine on free passengers in one day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BESTबेस्ट