अपयश लपविण्यासाठी भावनिक मुद्यांचा आधार; प्रवीण दरेकर यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 06:48 IST2020-09-07T01:14:39+5:302020-09-07T06:48:34+5:30
राज्य सरकार भांबावलेले आहे. स्वत: पुन:श्च हरिओम म्हणतात आणि पुन्हा लॉकडाऊन लावतात.

अपयश लपविण्यासाठी भावनिक मुद्यांचा आधार; प्रवीण दरेकर यांचा आरोप
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्ष म्हणून राज्य सरकारला विविध प्रश्नांवर विशेषत: कोरोनाच्या उपाययोजनांबाबत जाब विचारू. कोरोनावरील लक्ष घडविण्यासाठी सरकार आता भावनिक मुद्यांचा आधार घेत असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केले.
पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दरेकर यांनी आज पक्षाची भूमिका मांडली. या अल्पमुदतीच्या अधिवेशनात जेवढा वेळ मिळेल तेवढ्या वेळात सरकारला महत्वाच्या विषयांवर जाब विचारू. कोरोनाच्या उपाय योजनांसंदर्भात सरकारला सर्व आघाड्यांवर अपयश आले आहे. कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार, क्वॉरंटाईन सेंटरमध्ये महिलांवर अत्याचार असे अनेक मुद्दे आहे.
राज्य सरकार भांबावलेले आहे. स्वत: पुन:श्च हरिओम म्हणतात आणि पुन्हा लॉकडाऊन लावतात. व्यापाऱ्यांनी मागणी केली म्हणून लॉकडाऊन उठवले असेही सांगतात. लॉकडाऊनमध्ये केंद्राकडून शिथिलता दिली जात असताना राज्यात मात्र काही निर्बंध उठवण्यातच आलेले नाहीत. राज्यात कोरोना आटोक्यात येत नाही, कोरोनावर नियंत्रण आणण्यात शासन पूर्ण अपयशी ठरले आहे. कुठलीही गोष्ट झाली की केंद्रावर ढकलायची आणि जबाबदारी झटकायची यावर आम्ही बोलणार. राज्य सरकारने नेमके काय केले आहे याचा 'पदार्फाश'च आम्ही अधिवेशनात करणार आहोत, असा इशारा दरेकर यांनी दिला.
अजूनही अधिवेशन कसे घेणार याबाबतची स्पष्टता सरकारकडून आलेली नाही. एकीकडे कोरोनाचा कहर असताना सुशांत सिंग राजपूत प्रकरणातून ड्रग्स आणि सेक्स रॅकेट, कंगना रनौतबाबत सरकारची भूमिका पाहता कोरोनावरील चर्चा भरकटविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आपले अपयश झाकण्यासाठी इतर भावनिक विषयांकडे लक्ष वळवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोपही दरेकर यांनी केला आहे.