VIDEO : कर्करोगाशी दोन हात करत ‘ती’ साकारतेय बाप्पा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 01:13 AM2019-08-30T01:13:22+5:302019-08-30T09:26:08+5:30

अभिनेत्री ते मूर्तिकार असा प्रवास : मूर्ती घडवताना मिळते जगण्याची प्रेरणा

Bappa says that she is doing two hands with cancer | VIDEO : कर्करोगाशी दोन हात करत ‘ती’ साकारतेय बाप्पा

VIDEO : कर्करोगाशी दोन हात करत ‘ती’ साकारतेय बाप्पा

Next

- मनीषा म्हात्रे 

मुंबई : गणेशोत्सव जवळ येत असल्याने सर्वांचीच लगबग सुरू झाली आहे. त्यात मूर्तिकारही बाप्पांच्या मूर्तीवर अखेरचा हात फिरवण्यात दंग आहेत. याच हातांपैकी एक हात हा कर्करोगासारख्या दुर्धर आजाराशी सामना करत बाप्पांच्या मूर्ती घडविण्यातून जगण्याची प्रेरणा घेणाऱ्या अभिनेत्री गीतांजली लवराज कांबळी हिचा.

गीतांजली या मुलुंडच्या म्हाडा कॉलनीत राहतात. सही रे सही, कुंकूसारख्या अनेक गाजलेल्या नाटक आणि मालिकांमधून आपल्यातील अभिनयाची चुणूक दाखवत त्या बाप्पाची मूर्तीही घडवत आहेत. १९९० मध्ये ‘माका घो गावलो’ या नाटकात काम करताना लवराज कांबळीसोबत त्यांची ओळख झाली आणि १९९१ मध्ये दोघेही विवाहबंधनात अडकले.

वस्त्रहरण नाटकामध्ये मच्छिंद्र कांबळी यांच्यासोबत गोप्याची भूमिका साकारणारे लवराज कांबळी यांचा वडिलोपार्जित मूर्ती घडविण्याचा व्यवसाय आहे. ते मूळचे मालवणच्या रेवंडी गावचे रहिवासी. लग्नानंतर गीतांजली यांनी मूर्ती घडविण्यास सुरुवात केली. त्यासोबतच नाटक, मालिकांमध्येही काम सुरूच होते. याचदरम्यान २०१२ मध्ये त्यांना कर्करोगाच्या आजाराने ग्रासले. त्यामुळे रंगभूमीवरून काही काळासाठी त्यांना एक्झिट घ्यावी लागली. आतापर्यंत ३६ केमोथेरपीच्या वेदनादायी प्रक्रियेतून त्यांना जावे लागले. हे वेदनादायी असले तरी गणेशमूर्ती घडविण्याची कला वेदना सहन करत जगण्याचे बळ देत राहते, असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

बाप्पाच्या आगमनाला काही महिने राहिले असताना, त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडणार होती. मात्र यादरम्यान आपले काही झाले तर मूर्ती वेळेत कशा पोहोचवणार या विचाराने त्यांनी शस्त्रक्रिया पुढे ढकलली आणि आपल्या पतीसोबत पुन्हा गणेशमूर्ती घडवायला सुरुवात केली आहे. जगण्याची आशा सोडली, तेव्हा या कलेने जगण्याची नवी प्रेरणा दिली, असे त्या सांगतात.



कलाकारांसाठी प्रशासन उदासीन
गीतांजली कांबळी यांना गर्र्भाशयाचा कर्करोग झाला आहे. शस्त्रक्रियेसाठी दोन लाखांचा खर्च आहे. या खर्चामुळे कांबळी कुटुंबीय चिंतित आहे. अशा कलाकारांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याची खंत लवराज कांबळी यांनी व्यक्त केली.

पत्नीचा अभिमान वाटतो
लवराज कांबळी यांनी, २००६ मध्ये पत्नीच्या नावाने गीतांजली प्रोडक्शनची स्थापना केली. त्यातून ४० हून अधिक नाटके केली. यापैकी गाजलेली नाटके म्हणजे ‘चंपू खाणावळी’, ‘तुका नाय माका’, ‘येवा कोकण आपलाच आसा’, ‘रात्रीचो राजा’. अशा अनेक नाटकांमध्ये त्यांनी काम केले आहे.
एकाच कुटुंबातील सर्व व्यक्ती या रंगभूमीशी बांधल्या असतानाही त्यांच्या वडिलोपार्जित मूर्तिकलेच्या व्यवसायामुळे गणेशोत्सवाच्या ४ महिने आधीपासूनच सर्व मंडळी नाटकांना मध्यांतर देत, आपला वेळ मूर्ती घडविण्यासाठी देतात. मृत्यूशी दोन हात करीत, पत्नी अशा अवस्थेतही बरोबरीने मूर्तिकला जोपासते, याचा अभिमान वाटत असल्याचे लवराज कांबळी यांनी सांगितले.

 

Web Title: Bappa says that she is doing two hands with cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.