पत्रकारांपासून कलाकारांपर्यंत सगळ्यांना चहा देणाऱ्या बबनशेठचा असाही अनाेखा अमृतमहाेत्सव
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 06:16 IST2026-04-28T06:15:20+5:302026-04-28T06:16:12+5:30
बबन केमकर यांच्या चहाच्या दुकानापुढे गप्पांची मैफल रंगत असे. त्या दिवशीच्या घडामोडींवर सुरस चर्चा होत असे.

पत्रकारांपासून कलाकारांपर्यंत सगळ्यांना चहा देणाऱ्या बबनशेठचा असाही अनाेखा अमृतमहाेत्सव
मुंबई - किमान तीन दशके पत्रकार, कलाकार, लेखक यांचा गप्पांचा हक्काचा अड्डा म्हणजे दादरच्या रेल्वे पुलाखालील बबन केमकर यांचे चहाचे दुकान. डाळिंबाचे दाणे व शेव घालून सजविलेल्या पोह्यांच्या बरोबर चॉकलेट टी घेत, बबनशेठ यांच्या दुकानात वर्षानुवर्षे मध्यरात्रीपर्यंत ‘चाय पे’ चर्चा रंगायच्या. त्यांचे चहाचे दुकान २००० मध्ये बंद झाले खरे, पण चहावाल्या बबन यांची आठवण कधीच पुसली गेली नाही. त्यामुळे बबन यांनी पंचाहत्तरीत प्रवेश केल्यानिमित्ताने या अड्ड्यावर रात्र रात्र गप्पांची मैफल सजविणाऱ्या सर्व मित्रमंडळींनी सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघात अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करुन स्मृतींना उजाळा दिला.
या निमित्ताने सर्वांना बबन भेटलेच, तसेच अनेकांना आपले त्या काळातील जीवाभावाचे मित्र देखील या गौरव संमेलनात भेटले. मात्र, सर्वांच्या गप्पांचा केंद्रबिंदू हा बबनशेठ हेच होते. कार्यक्रमा दरम्यान बबन यांना भेटवस्तू व त्यांच्यावर काढलेले अर्कचित्र देण्यात आले. यावेळी बबन यांच्याबद्दल बोलताना ज्येष्ठ पत्रकार व माजी खासदार कुमार केतकर यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. १९७० व १९८० च्या दशकांत माध्यमांचे प्रतिनिधी आर्थिक पातळीवर जगण्याचा संघर्ष करत होते आणि त्या संघर्षाचा बबन हा केवळ साक्षीदार नव्हता तर तो त्या काळाचा प्रतिनिधी होता, अशा शब्दांत केतकरांनी उजाळा दिला. तर, बबन फूटपाथवर चहा विकत होता, ती फूटपाथ संस्कृती टिकली पाहिजे, असे मत माजी आमदार कपिल पाटील यांनी व्यक्त केले.
बबनशेठ यांच्या या अड्ड्यावर केवळ कलाकार मंडळी चहासाठी जमत नसत तर या अड्ड्यावर सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक गोष्टींची देवाण घेवाण चाले. बबन स्वतः जरी चहा बनवत असले तरी त्यांची जाण ही चतुरस्त्र होती. त्यामुळेच नाटक, वर्तमानपत्रातील अग्रलेख, एखाद्या नव्या लेखकाचे येऊ घातलेले पुस्तक याची अद्ययावत माहिती त्यांच्याकडे असे. किंबहुना त्यांच्याकडून पत्रकारांना अनेकदा बातम्या देखील मिळाल्या आहेत, अशी चर्चा उपस्थित ज्येष्ठ पत्रकारांमध्ये रंगली होती.
कोण आहेत बबन केमकर ?
बबन केमकर यांच्या चहाच्या दुकानापुढे गप्पांची मैफल रंगत असे. त्या दिवशीच्या घडामोडींवर सुरस चर्चा होत असे. कार्यालयातून रात्री काम संपवून अनेक पत्रकार बबन यांच्या दुकानावर जमायचेच. तिथे बबन स्पेशल चॉकलेट चहा, कधी डाळिंब पेरलेले पोहे, पनीर पोहे असे पदार्थ फस्त करून मग शेवटची गाडी पकडून घरी जाणे, हा अनेकांचा बऱ्याच वर्षांचा शिरस्ता होता. मात्र, २००० या वर्षानंतर बबन यांचे दुकान बंद झाले आणि ही मैफल खुंटली.
माझा चरितार्थ फूटपाथवर चालला. त्याच फूटपाथमुळे अनेक क्षेत्रातील दिग्गजांची मला ओळख झाली आणि त्यांच्यामुळेच मी आज इथवर आलो. - बबन केमकर