लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार, अशा चर्चा सुरू असतानाच शिंदेसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मनसेप्रमुखराज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरेमहायुतीसोबत आले नाहीत तरी चालतील; पण त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्रितपणे मुंबई महापालिका लढू नये, असा प्रयत्न महायुतीचा घटक असलेल्या शिंदेसेनेकडून होत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
उदय सामंत यांनी मंगळवारी सकाळी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. राज यांच्यासोबत सुमारे अर्धा तासाच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सामंत म्हणाले की, ते स्वतः सकाळी या भागात काही कामानिमित्त गेले असता राज यांना फोन करून भेटीची विनंती केली. तुमच्या मनात ज्या इतर राजकीय शंका आहेत, त्यावर कसलीही चर्चा झाली नाही. चहा पिलो, खिचडी खाल्ली आणि निघालो. मुंबई महापालिकेबाबत चर्चा झाली असती तर तसे जाहीर करायला काही हरकत नव्हती, असेही सामंत म्हणाले.
...तर महायुतीला फटका
मनसेने आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाशी अधिकृत युती करून निवडणूक लढविली नाही. त्यामुळे यापुढे मनसे हा पक्ष भाजप किंवा शिंदेसेनेशी युती करेल? किंवा महायुतीचा भाग होतील? याबाबत साशंकता आहे. उद्धवसेनेसोबत राज यांनी महापालिका निवडणूक लढविल्यास महायुतीला फटका बसेल, ही शक्यता लक्षात घेऊन राज यांना उद्धव यांच्यापासून दूर ठेवण्याचे प्रयत्न या भेटीगाठींतून होत असल्याचे बोलले जात आहे.