३ मे रोजी राज्यात काहीही घडू शकतं; प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली शंका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 08:40 PM2022-04-26T20:40:45+5:302022-04-26T20:40:56+5:30

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी १ मे रोजी शांती मार्च काढणार असल्याचे जाहीर केले आहे.

Anything can happen in the state on May 3; Vanchit Bahujan Aghadi Chief Prakash Ambedkar expressed doubts | ३ मे रोजी राज्यात काहीही घडू शकतं; प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली शंका

३ मे रोजी राज्यात काहीही घडू शकतं; प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली शंका

Next

मुंबई- मशिदींवरील भोंगे हटवण्याच्या अजेंड्यावर ठाम भूमिका घेतल्यानंतर मनसे पुन्हा एकदा चर्चेत आहे. राज ठाकरे यांनी ३ मे पर्यंत अल्टिमेटम दिलेला असून, १ मे रोजी औरंगाबाद येथे सभा होणार आहे. मात्र, राज ठाकरेंच्या औरंगाबाद दौऱ्यापूर्वीच औरंगाबाद पोलिसांनी शहरात जमावबंदी आदेश लागू केले आहेत. त्यामुळे राज ठाकरेंची सभा होणार की नाही, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक झाली. या बैठकीनंतर औरंगाबादमध्ये राज ठाकरेंची सभा शंभर टक्के होणार असल्याची माहिती मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी दिली. आमच्या सभेची पूर्वतयारी उत्तम प्रकारे सुरु आहे. औरंगाबादसह मराठवाड्यामध्ये राज ठाकरेंच्या सभेची उत्सुकता दिसून येत आहे. पोलिसांनी अजूनही सभेला परवानगी दिलेली नाही. मात्र येत्या १-२ दिवसांत पोलिसांची परवानगी मिळेल, असं नितीन सरदेसाई यांनी सांगितलं. 

राज ठाकरेंच्या सभेची चर्चा सुरु असताना, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी १ मे रोजी शांती मार्च काढणार असल्याचे जाहीर केले आहे. मनसे, भाजपा आणि राज्य सरकारची भूमिका पाहता, ३ मेला राज्यात काहीही घडू शकतं, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे आम्ही शांती मार्च काढणार असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं. तसेच या मार्चमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाला थारा नसून विविध संघटनेचं स्वागत केलं जाईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. 

औरंगाबादमध्ये १ मे रोजी राज ठाकरेंची सभा आहे. या सभेला पाच दिवस शिल्लक असताना सभेच्या दोन दिवस आधीच राज ठाकरे कुठे जाणार याबाबत मोठी उत्सुकता लागली आहे. राज ठाकरे २९ आणि ३० एप्रिलला पुण्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. तिथे ते कार्यकर्त्यांसोबत बैठका, मनपा निवडणुकीची मोर्चेबांधणी करतील. यानंतर ३० एप्रिलला सायंकाळी ते औरंगाबादकडे रवाना होतील. 

दरम्यान, सभेला परवानगी मिळाली नसली तरीदेखील राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना सभेची तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पोलीस परवानगीच्या भानगडीत पडू नका, सभेच्या तयारी लागा असे आदेश ठाकरे यांनी मनसेच्या नेत्यांना आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती पक्षसूत्रांनी दिली आहे. 

Web Title: Anything can happen in the state on May 3; Vanchit Bahujan Aghadi Chief Prakash Ambedkar expressed doubts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.