Anil Deshmukh: अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा; सीबीआयचे मुंबई, नागपुरातील घरांसह १० ठिकाणी छापे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2021 06:41 IST2021-04-25T01:03:57+5:302021-04-25T06:41:39+5:30
दिवसभराच्या कारवाईनंतर अटकेची टांगती तलवार

Anil Deshmukh: अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा; सीबीआयचे मुंबई, नागपुरातील घरांसह १० ठिकाणी छापे
नागपूर/मुंबई : महिन्याला शंभर कोटींच्या हप्ता वसुलीप्रकरणाच्या कथित आरोपाबद्दल राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्याविरोधात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल करून त्यांच्या मुंबई, नागपूर येथील निवासस्थानांसह एकूण विविध १० ठिकाणी शनिवारी छापे टाकले.
नागपूर येथील घरी देशमुख यांची दहा तासांहून अधिक काळ चौकशी सुरू असून, त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याचे सूत्रांनी सांगितले. सायंकाळी सातच्या सुमारास सीबीआय पथक त्यांच्या नागपुरातील घरातून निघाले आणि मागोमाग देशमुख हेदेखील काटोलला निघून गेले. मात्र, तासाभरातच पथक पुन्हा त्यांच्या घरी पोहोचले आणि त्यांना माघारी बोलावून घेण्यात आले.
वृत्त लिहिस्तोवर त्यांची चौकशी सुरूच होती. त्यांच्या नागपुरातील घरचे कार्यालय सील करण्यात आले आहे. मुंबईतील सरकारी निवासस्थान ज्ञानेश्वरी व त्यांच्या वरळी येथील सुखदा अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्येही जवळपास सात तास झडती घेण्यात आली. तेथून अनेक दस्तावेज, कागदपत्रे जप्त करण्यात आल्याचे समजते.
सीबीआयच्या दिल्ली व मुंबई पथकातील एकूण सुमारे ६० जणांच्या पथकाने शनिवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून मुंबई, नागपूर, ठाणे व पुण्यात ठिकठिकाणी स्वतंत्रपणे या कारवाईला सुरुवात केली. या कारवाईमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून, महाआघाडीचे नेते व भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत.
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझेला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दर महिन्याला १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आराेप ‘लेटरबॉम्ब’द्वारे केला हाेता. यासंदर्भात दाखल याचिकेवर उच्च न्यायालयाने १५ दिवसांत प्राथमिक चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सर्व संबंधितांचे जबाब नोंदवून तपास करण्यात आला. त्याबाबतचा अहवाल सीबीआय महासंचालकांकडे सादर केल्यानंतर शुक्रवारी दिल्लीत अनिल देशमुख व अन्य पाच अनोळखी व्यक्तींविरुद्ध भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार, सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक दिल्लीहून नागपूर आणि मुंबईत पोहोचले.
घटनाक्रम...
१७ मार्च - परमबीर सिंग यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून होमगार्डकडे उचलबांगडी.
१८ मार्च - ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ सोहळ्यात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांचे परमबीर सिंग यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे वक्तव्य.
२० मार्च - परमबीर सिंग यांचे मुख्यमंत्र्यांना देशमुख यांच्यावर आरोप करणारे पत्र.
५ एप्रिल - उच्च न्यायालयाचे जयश्री पाटील यांच्या याचिकेप्रकरणी प्राथमिक चौकशी करण्याचे सीबीआयला आदेश.
५ एप्रिल - अनिल देशमुख यांचा गृहमंत्रिपदाचा राजीनामा
६ एप्रिल - सीबीआयकडून प्राथमिक चौकशी सुरू
१४ एप्रिल - अनिल देशमुख यांची सुमारे १० तास चौकशी
२१ एप्रिल - सीबीआयचे अधीक्षक आर. गुजियाल यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल
२४ एप्रिल - अनिल देशमुख यांच्या मुंबई, नागपूर निवासस्थानांसह १० ठिकाणी सीबीआयचे छापे,
कुटुंब नास्ता करण्याच्या तयारीत असतानाच पथकाचा छापा
शनिवारी सकाळी ७.३० ते ७.४५ च्या सुमारास इनोव्हा आणि इर्टिगा अशा दोन गाड्यांमधून सीबीआयचे पथक देशमुख यांच्या नागपुरातील जीपीओ चौकातील निवासस्थानी दाखल झाले. पथकात २ महिलांसह १० अधिकाऱ्यांचा समावेश होता. त्यांनी देशमुखांना आपली ओळख सांगून चौकशीसाठी आल्याची माहिती दिली. त्यांच्या कुटुंबीयांसह सहा ते आठ जण नास्ता करण्याच्या तयारीत होते. त्या सर्वांचे मोबाइल ताब्यात घेण्यात आले. प्रारंभी पथकाने निवासस्थानाचा कानाकोपरा तपासला. कपाट, लॉकर आदींची तपासणी केल्यानंतर काही कागदपत्रे ताब्यात घेतली. त्याची पाहणी केल्यानंतर या पथकाचे नेतृत्व करणाऱ्या अधिकाऱ्यांनी देशमुख यांची विचारपूस करण्यास प्रारंभ केला.
स्थानिक पोलिसांना सीबीआयकडून धाडीची साधी सूचनाही देण्यात आली नव्हती. सकाळी ९ वाजेपर्यंत सीताबर्डी पोलीसही या कारवाईपासून अनभिज्ञ होते. पीपीई किट घातलेले लोक सीबीआयचे पथक असल्याचे लक्षात आल्यानंतर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी वरिष्ठांना माहिती दिली. त्यानंतर ताफा देशमुख यांच्या निवासस्थानासमोर पोहोचला.
पथकाला सहकार्य केले : देशमुख
सीबीआयचे पथक सर्चिंगसाठी आमच्याकडे आले होते. त्यांना आम्ही पूर्ण सहकार्य केले. आता मी माझ्या काटोल मतदारसंघात कोविडच्या रुग्णांची स्थिती कशी आहे, ते बघण्यासाठी दौऱ्यावर जात आहे, अशी मोजकी प्रतिक्रिया देशमुख यांनी दिली. पत्रकारांच्या प्रश्नावर बोलण्याचे त्यांनी टाळले. त्यानंतर ते गाडीत बसून निघून गेले.
सीसीटीव्ही फुटेज, लॅपटॉप, प्रिंटर हस्तगत
मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगल्यावर जाऊन शुक्रवारी रात्री सीबीआयच्या पथकाने तेथील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. त्यानंतर शनिवारी सकाळी पुन्हा दोन स्वतंत्र पथकांनी तेथे व वरळीतील सुखदा अपार्टमेंटमधील देशमुख यांच्या ११०१ क्रमांकाच्या फ्लॅटवर छापा टाकला. तेथून लॅपटॉप, प्रिंटर व अन्य दस्तावेज जप्त केल्याचे समजते. सुमारे ७ तासांनंतर एका मोठ्या पिशवीत सर्व ऐवज जमा करून चर्चगेट येथील सीबीआयच्या गेस्ट हाऊसमध्ये पथक माघारी परतले. त्यांनी अधिकृतपणे काहीही माहिती देण्यास नकार दिला.
पीपीई किटचे संरक्षण
सीबीआय कारवाईवेळी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पीपीई किट परिधान केले होते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्यांनी ही दक्षता घेतली होती. छाप्याची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बंदोबस्त वाढविला. सुरुवातीला आयजी आणि एडीजी दर्जाचे तीन वरिष्ठ अधिकारी आपल्या सहकाऱ्यांसह देशमुख यांच्या निवासस्थानी चौकशी करीत असल्याचे सांगितले गेले.
राष्ट्रवादीची घोषणाबाजी
या कारवाईने शहरात खळबळ उडाली. दुपारी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देशमुख यांच्या घरासमोर घोषणाबाजी केली.