Join us
Daily Top 2Weekly Top 5

Ajit Pawar : संजय राऊतांकडून शिका, बचावासाठी किरीट सोमय्यांचा अजित पवारांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 15:59 IST

Ajit Pawar : अजित पवारांना आता साखर कडू वाटायलीय का, ज्यावेळी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या, त्यांना भागधारक केलं, हजारो शेतकऱ्यांचे कारखाने पवार परिवार लुटत होते, तेव्हा काही आठवण होत नव्हती का?, असा सवाल भाजपा नेते किरीट सोमय्यांनी उपस्थित केला आहे.

ठळक मुद्दे या सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आमच्या जमिनी, कारखाने पवार कुटुंबीयांनी, एनसीपीने ढापल्या, असे सोमय्यांनी सांगितलं. 

मुंबई - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी प्राप्तिकर विभागाकडून कारवाई केली जात असून, जरंडेश्वरसह दौंड शुगर, आंबलिक शुगर, पुष्पदनतेश्वर शुगर, नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर कारवाई सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. तर, अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजपा नेते किरीट सोमय्यांनी उपमुख्यमंत्र्यांना सल्ला दिलाय. 

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली असून, तुम्ही पाप केले, तुम्ही घोटाळे केले तर कबुल करा, असे म्हटले आहे.  तसेच, अजित पवारांना आता साखर कडू वाटायलीय का, ज्यावेळी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या, त्यांना भागधारक केलं, हजारो शेतकऱ्यांचे कारखाने पवार परिवार लुटत होते, तेव्हा काही आठवण होत नव्हती का?, असा सवाल सोमय्यांनी उपस्थित केला आहे. तसेच, मी शेतकऱ्यांना भेटलो, पारनेरच्या, हसन मुश्रिफांच्या कारख्यान्यातील शेतकऱ्यांना भेटलो, या सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आमच्या जमिनी, कारखाने पवार कुटुंबीयांनी, एनसीपीने ढापल्या, असे सोमय्यांनी सांगितलं. 

महाराष्ट्र लुटून खाल्ला

अजित पवारांना माझा प्रश्न आहे, जरंडेश्वर कारखान्याचा कोण मालक आहे?. तुमच्या कुटुंबाला महाराष्ट्र लुटायचा ठेका दिलाय का? ठाकरे-पवार सरकारने गेल्या दीड वर्षात महाराष्ट्राला लुटून खाल्लं आहे. त्यामुळे ही कारवाई होणारच, असेही सोमय्यांनी म्हटलं आहे. पवारसाहेब, तुमची पोलीस ऑफिसरच्या घरात जाऊन मारहाण करते, तेव्हा तुम्ही बघ्याची भूमिका घेतली. तुमचे कार्यकर्ते, गुंड जरंडेश्वर कारखान्याजवळ आले होते, त्यांनी माझा हात खेचण्याचा प्रयत्न केला. त्यावेळीही तुम्ही गप्प बसले होते, असे म्हणत सोमय्यांनी थेट शरद पवार यांनाच लक्ष केलंय. 

संजय राऊतांकडून शिका

अजित पवार तुम्हाला जर परिवाराची एवढी चिंता असेल, तर संजय राऊत यांच्याकडून शिका, असा सल्लाच सोमय्यांनी उपमुख्यमंत्र्यांना दिलाय. संजय राऊत उड्या मारायचे, बोंबाबोंब करायचे. पण, शेवटी 55 लाख रुपये चोरीचा माल परत केलाच ना. मिलिंद नार्वेकर यांचाही बेकायदेशीर बंगला तोडलाच ना, असे म्हणत तुम्हीही बेनामी संपत्ती जाहीर करून कोर्टात गडबड घोटाळ्याचं सांगा, मग कोणी धाड घालणार नाहीत, असे सोमय्यांनी म्हटले आहे.     

टॅग्स :संजय राऊतअजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसकिरीट सोमय्यामाहिती तंत्रज्ञानधाड