"ठाकरे-मोदी १००० टक्के एकत्र येणार"; केसरकरांनंतर आणखी एका आमदाराचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 01:21 PM2024-03-06T13:21:44+5:302024-03-06T13:41:06+5:30

आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे दोघेजण दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्याचे दीपक केसरकर यांनी म्हटले, त्यांनी काही माध्यमांत आलेल्या बातम्यांचा दाखला देत हे विधान केलं.

After Deepak Kesarkar, another MLA Shahaji bapu patil's claim; "Uddhav Thackeray- Narendra Modi will come together 1000 percent" | "ठाकरे-मोदी १००० टक्के एकत्र येणार"; केसरकरांनंतर आणखी एका आमदाराचा दावा

"ठाकरे-मोदी १००० टक्के एकत्र येणार"; केसरकरांनंतर आणखी एका आमदाराचा दावा

मुंबई - महाराष्ट्राचं राजकारण गेल्या ५ वर्षात अतिशय बेभरवशाचं झाल्याचं दिसून आलं. कोणता नेता कोणत्या पक्षासोबत युती करेल आणि कोणता पक्ष कोणत्या पक्षासोबत आघाडी करेल हा अंदाज बांधनेच चुकीचं ठरणारं आहे. त्यातच, राज्याच्या राजकारणात पुन्हा एक मोठा राजकीय भूकंप घडू शकतो. भाजपा आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकत्र येऊ शकतात, अशी शक्यता शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याने वर्तवली आहे. काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे दोघेजण दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून आल्याचा दावा शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी केला. त्यानंतर, आता आमदार शहाजी बापू पाटील यांनीही एक हजार टक्के मोदी-ठाकरे एकत्र येणार असल्याचं म्हटलं आहे. 

आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे दोघेजण दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्याचे दीपक केसरकर यांनी म्हटले, त्यांनी काही माध्यमांत आलेल्या बातम्यांचा दाखला देत हे विधान केलं. मात्र, उद्धव ठाकरे यांनी दोनवेळा दिलेला शब्द फिरवला आहे. त्यामुळे, आता त्यांना जवळ करायचे की नाही, हे पंतप्रधान मोदी यांनी स्वत:च ठरवावे, पण, यानिमित्ताने ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा भाजपासोबत येण्याच्या हालचाली सुरु असल्याचे सिद्ध झाले आहे. तसेच, शिवसेना ठाकरे गट पुन्हा एकदा भाजपासोबत एनडीए आघाडीत आला तर राज्यातील राजकीय समीकरण बदलणार आहे, असेही दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. आता, काय झाडी, डोंगार, हाटील फेम आमदार शहाजी बापू पाटील यांनीही मोदी आणि ठाकरे एकत्र येणार असल्याचा मोठा दावा केला आहे.  

सांगोला तालुक्यातील महुद येथील सरपंचांनी कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी, प्रसार माध्यमांशी बोलताना शहाजी बापू पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. उद्धव ठाकरे पुन्हा एनडीएसोबत येणार, अशी चर्चा सुरू आहे, त्याकडे आपण कसे पाहता, असा सवाल शहाजी बापू पाटील यांना विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना मी याकडं कस-बिसं बघत नाही. एक हजार टक्के उद्धव ठाकरे आणि मोदीसाहेब एकत्र येणार आहेत. आपला अंदाज चुकणार नाही, दिवस कुठला आहे, हे बघा. हे व्हावच लागेल, याला कारण म्हणजे हिंदुत्वाचा विचार बाजूला ठेऊन चालणार नाही. उद्धव ठाकरेंना मोदींकडे जावं लागेल यात कुठली शंका नाही, लवकरात लवकर हा दिवस येणार आहे, असे उत्तर शहाजी बापू पाटील यांनी दिले आहे. दरम्यान, शहाजी पाटील यांच्या या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर, दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे व रश्मी ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्याचा दावा केला होता. त्यामुळे, शहाजी पाटील यांचं हे विधान पुन्हा राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारं आहे. 

संजय राऊत महाराष्ट्राचा खलनायक

संजय राऊत हा महाराष्ट्राचा खलनायक आहे, दुर्योधन म्हणून आज महाराष्ट्रातील लोकं त्यांच्याकडे बघायला लागले आहेत. राऊतांची विधान हे गावच्या भाषेत सांगायचं तरे, शेंड्याच्या जांभळाला हात घालायचा, असंच आहे. तुझी उंची ४ फूट, जांभळ आहे, वरी १५० फुटावर, असे म्हणत शहाजी बापू पाटील यांनी संजय राऊतांवर जोरदार निशाणा साधला.

भेटीबाबत पीएमओने खुलासा करावा - राऊत

रश्मी ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असा दावा विरोधकांकडून करण्यात आला त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत कडाडले असून त्यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला. खासदार संजय राऊत म्हणाले की, रश्मी ठाकरे - पंतप्रधान मोदींची भेट झाली असेल तर पीएमओ कार्यालयाने खुलासा करावा. केसरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दुसरे काही काम नाही. ते अस्वस्थ झालेत. ते भाजपाचे, मोदींचे गुलाम बनलेत. अशाप्रकारे भेट झाली असं ते म्हणत असतील तर PMO कडून खुलासा करा, या तारखेला भेट झाली वैगेरे. आम्ही कुणाला भेटलो नाही. भेटणार नाही असं राऊतांनी स्पष्ट केले. 
 

Web Title: After Deepak Kesarkar, another MLA Shahaji bapu patil's claim; "Uddhav Thackeray- Narendra Modi will come together 1000 percent"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.