लाईव्ह कॉन्सर्टनंतर तरुणांच्या गटाची भररस्त्यात स्पीकर लावून हुल्लडबाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 13:05 IST2026-04-15T13:05:00+5:302026-04-15T13:05:22+5:30
नेस्को लाईव्ह कॉन्सर्टनंतर काही तरुणांच्या एका ग्रुपने रस्त्यावरच मोठ्या आवाजात गाणी लावून धिंगाणा घातल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. याबाबत पोलिसांनी मात्र, असा कुठलाच प्रकार घडला नसल्याचे म्हटले आहे.

लाईव्ह कॉन्सर्टनंतर तरुणांच्या गटाची भररस्त्यात स्पीकर लावून हुल्लडबाजी
मुंबई - नेस्को लाईव्ह कॉन्सर्टनंतर काही तरुणांच्या एका ग्रुपने रस्त्यावरच मोठ्या आवाजात गाणी लावून धिंगाणा घातल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. याबाबत पोलिसांनी मात्र, असा कुठलाच प्रकार घडला नसल्याचे म्हटले आहे.
एकीकडे १० वाजेपर्यंत परवानगी असताना रात्री उशिरापर्यंत कॉन्सर्ट सुरु होता. त्यातही खुलेआम ड्रग्जच्या गोळ्या कार्यक्रमात देण्यात येत होत्या. त्याबाबतही पोलिसांना माहिती मिळाली नाही. दोघांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर रविवारी पहाटे अडीच वाजता रुग्णालयाकडून याबाबत समजताच पोलिस जागे झाले. एवढेच नाही तर या कार्यक्रमानंतर गोरेगावच्या रस्त्यावर ही तरुणाई बेधुंद होत हुल्लडबाजी करताना दिसून आली. त्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
वाहनावर स्पीकर लावून तरुणांची जल्लोषात नाचगाणी सुरू होती. मात्र त्याकडेही पोलिसांचे लक्ष गेले नाही. या हुल्लडबाजी बाबत पोलिस उपायुक्त महेश चिमटे यांना विचारताच त्यांनी असे काही झाले नसल्याचे सांगितले आहे. तसेच अधिक तपास सुरू असल्याचे सांगितले.
नेस्को म्हणते, तपासाला आम्ही पूर्ण सहकार्य करत आहोत
नेस्को सेंटरमध्ये शनिवारी रात्री घडलेल्या प्रकारानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यामुळे नेस्कोने आपले म्हणणे मांडले आहे. ‘११ एप्रिल २०२६ रोजी नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान एक दुर्दैवी घटना घडली. त्यानंतर, १३ एप्रिल २०२६ रोजी कंपनीचे उपाध्यक्ष (इव्हेंट्स अँड एक्झिबिशन्स) आणि वरिष्ठ व्यवस्थापकीय अधिकारी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कंपनी तपासाला पूर्ण सहकार्य करत आहे. कंपनी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत आहे’, अशी माहिती नेस्कोच्या वतीने देण्यात आली.