तेल, रसायन कंपन्यांची आयुक्तांकडून कानउघाडणी

By Admin | Updated: June 16, 2015 01:43 IST2015-06-16T01:43:24+5:302015-06-16T01:43:24+5:30

गेल्या महिन्याभरात आगीच्या तीन भीषण घटनेने महापालिकेची झोप उडवली आहे़ वडाळा येथील दुर्घटनेने तर मुंबईवर मोठे संकट ओढावण्याचा धोका होता़

Advocates of Oil and Chemical Companies | तेल, रसायन कंपन्यांची आयुक्तांकडून कानउघाडणी

तेल, रसायन कंपन्यांची आयुक्तांकडून कानउघाडणी

मुंंबई : गेल्या महिन्याभरात आगीच्या तीन भीषण घटनेने महापालिकेची झोप उडवली आहे़ वडाळा येथील दुर्घटनेने तर मुंबईवर मोठे संकट ओढावण्याचा धोका होता़ त्यामुळे तेल व रासायनिक कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक पालिका मुख्यालयात बोलावून आयुक्तांनी संबंधितांची कानउघडणी केली़ त्यानुसार सर्व तेलवाहिन्या गळतीमुक्त असल्याचे प्रमाणपत्र एक महिन्यात पालिकेकडे सादर करण्याचे ताकीद मुंबई पोर्ट ट्रस्टला (बीपीटी) देण्यात आली आहे़
वडाळा येथील मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवरील तेलवाहिनीला शनिवारी संध्याकाळी भीषण आग लागली़ या परिसरात अनेक तेल कंपन्या असल्याने मुंबईवर मोठी आपत्ती ओढावण्याचा धोका होता़ मात्र गळतीच्या दुरुस्तीनिमित्त ही तेलवाहिनी बंद करण्यात आली होती़ तसेच अग्निशमन दलाने १३ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर रविवारी सकाळी ही आग आटोक्यात आणली़ या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही़ मात्र या घटनेमागचे कारण आणि आर्थिक नुकसान अद्याप कळू शकलेले नाही़ त्यामुळे याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहेत़ आगीच्या दुर्घटना वारंवार घडत असल्याने आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून आयुक्त अजोय मेहता यांनी संबंधित प्राधिकरणांना आज बोलावणे धाडले़ या बैठकीला मुंबई पोर्ट ट्रस्ट, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, राष्ट्रीय केमिकल्स व फर्टीलायझर्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली़ त्यांच्या हद्दीतील परिसराची काळजी घेणे व माहिती तयार ठेवण्याची ताकीद आयुक्तांनी संबंधितांना दिली़ (प्रतिनिधी)

बीपीटीला महिन्याची मुदत
एका महिन्याच्या कालावधीत सर्व यंत्रणांबाबत आवश्यक चाचण्या करुन घ्याव्या, अशी सूचना बीपीटीला आयुक्तांनी केली आहे़ तसेच गांभीर्याने उपाययोजना करुन तेलवाहिन्या गळतीमुक्त झाल्याबाबत बीपीटीने पालिकेला एक महिन्यात प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत़

Web Title: Advocates of Oil and Chemical Companies