प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई

By Admin | Updated: February 4, 2015 01:14 IST2015-02-04T01:14:04+5:302015-02-04T01:14:04+5:30

राज्याचे उद्योग व पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी मंगळवारी सकाळी एमआयडीसीमधील विविध ठिकाणांची पाहणी केली.

Action on polluting factories | प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई

प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई

पनवेल : तळोजा औद्योगिक परिसरातील प्रदूषणासंबंधीच्या रहिवाशांच्या तक्रारींची दखल घेवून राज्याचे उद्योग व पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी मंगळवारी सकाळी एमआयडीसीमधील विविध ठिकाणांची पाहणी केली. येथील प्रदूषण पसरविणाऱ्या कारखान्यांची कागदपत्रे तपासून व प्रदूषणाचा अहवाल मागवून संबंधित कारखान्यांवर लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन राज्यमंत्री पोटे यांनी यावेळी दिले.
तळोजा एमआयडीसी परिसरात ९०० हेक्टरच्या जागेत ९५० पेक्षा जास्त लहान, मोठ्या कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांतील रसायनयुक्त पाण्यावर सीइटीपीमार्फत प्रक्रिया करुन त्यानंतर हे पाणी नदीत सोडले जाणे आवश्यक आहे, मात्र प्रत्यक्षात हे पाणी थेट येथील कासाडी नदीत सोडले जाते. या प्लान्टची पाहणी करताना मंत्री महोदयांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. या प्रकल्पावर दरमहा लाखो रुपये खर्चूनही नदीत दूषित पाण्याचीच मात्रा जास्त असल्याचे आढळून आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे याठिकाणी होणाऱ्या प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या कारखान्यांवर व या प्रकाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. तसेच पाणी उपसा करणारे किती पंप याठिकाणी आहेत? त्यापैकी किती सुरु आहेत, किती बंद आहेत? त्यांचे येणारे बिल यासंबंधीही महावितरणकडून अहवाल मागविण्यात येणार आहे. पोटे यांनी तळोजा एमआयडीसी परिसरातील खड्डे, सुरु असलेल्या प्रदूषणाबाबत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.
यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे यशवंत सोनटक्के, एमआयडीसीमधील अधिकारी आर. पी. पाटील आदींसह भाजपाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड आदींसह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या पाहणी दौऱ्यात सहभागी झाले होते. यावेळी नावडे रहिवासी मंडळाने विविध समस्यांचे निवेदन राज्यमंत्र्यांना सुपूर्द केले. (प्रतिनिधी)

Web Title: Action on polluting factories