Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 18:07 IST2025-06-17T18:06:15+5:302025-06-17T18:07:50+5:30

Mumbai School Bus: गेल्या पाच महिन्यांत तीन लाख ७१ हजारांचा दंड वसूल

Action against 150 school buses in Mumbai, what do the rules say? | Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?

Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?

मुंबई : शहरात हजारो विद्यार्थी दररोज स्कूल बसने प्रवास करतात. मात्र, या बस विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी सुरक्षित आहेत का, याची खातरजमा शाळांबरोबर पालकांनीही करणे आवश्यक आहे. बसच्या फिटनेस प्रमाणपत्रासह अन्य नियमांचे उल्लंघन केल्याने मुंबई सेंट्रल, अंधेरी आणि वडाळा येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयांनी (आरटीओ) गेल्या पाच महिन्यांत १५० स्कूल बसवर कारवाई करत त्यांच्याकडून तीन लाख ७१ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
 
मुंबईतील अनेक खासगी शाळा ९ जूनपासून सुरू झाल्या आहेत. मात्र, अद्याप अनेक स्कूल बस चालकांनी योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण केलेले नाही, अशी माहिती आरटीओ विभागाने दिली. या प्रमाणपत्रांचे दरवर्षी नूतनीकरण करणे बंधनकारक असूनही, अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. आरटीओ अधिकाऱ्यांनी गेल्या पाच महिन्यांत ६२९ वाहनांची तपासणी केली. त्यात फिटनेस सर्टिफिकेट नसणाऱ्या, विमा किंवा परवाना कालबाह्य असलेल्या आणि योग्यता प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांवर कारवाई केली आहे. 

नियम काय सांगतात?
- वाहनाची नोंदणी स्कूल बस प्रकारात झालेली असावी.
- कर, परवाना, विमा, पीयूसी यांसह सर्व कागदपत्रे वैध असावीत.
- मुंबईसाठी डिझेल, पेट्रोल बसचे वय ८ वर्षांपेक्षा जास्त नसावे; सीएनजी बस १५ वर्षांपर्यंत चालू शकते.
- वाहनाचा रंग पिवळा आणि त्यावर ‘स्कूल बस’ असे स्पष्ट लिहिलेले असावे. 
- पायरीची उंची २०० मिमीपेक्षा जास्त नसावी.
- हात धरता येईल असा स्टीलचा कठडा पुढच्या दरवाजाजवळ असावा. 
- बसमध्ये उभे स्टील दांडे आणि मल्टी-प्रेशर हॉर्न निषिद्ध.
- प्रथमोपचार पेटी आणि २ आयएसआय मानांकित ५ किग्रॅ अग्निशमन यंत्र असावेत.
- खिडक्यांवर तीन आडवे स्टीलचे दांडे असावेत.
- वेगनियंत्रक यंत्र बसवलेली असावी. 
- स्टील बॉडी बंद बस असावी.

दरवर्षी नूतनीकरण गरजेचे
स्कूल बसचे योग्यता प्रमाणपत्र केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ मधील नियम ६२ नुसार बस नोंदणी झालेल्या तारखेपासून आठ वर्षांपर्यंत दिले जाते. मात्र, सुरुवातीला दर दोन वर्षांनी आणि त्यानंतर मात्र प्रत्येक वर्षाला त्याचे नूतनीकरण करावे लागले. 
यासाठी १६ अटी आहेत. या सर्व अटींचे पालन करणाऱ्या वाहनांना योग्यता प्रमाणपत्र जारी करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Action against 150 school buses in Mumbai, what do the rules say?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.