“एकनाथ शिंदेंचे बंड लोकशाहीविरोधी, सध्या सर्कस सुरुय”; आदित्य ठाकरेंचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 06:10 PM2022-06-27T18:10:33+5:302022-06-27T18:11:26+5:30

आताच्या घडीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मनात केवळ लोकसेवेचा विचार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

aaditya thackeray reaction after supreme court decision about shiv sena rebel eknath shinde group | “एकनाथ शिंदेंचे बंड लोकशाहीविरोधी, सध्या सर्कस सुरुय”; आदित्य ठाकरेंचा खोचक टोला

“एकनाथ शिंदेंचे बंड लोकशाहीविरोधी, सध्या सर्कस सुरुय”; आदित्य ठाकरेंचा खोचक टोला

googlenewsNext

मुंबई: शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह पक्षाच्या ३५ हून अधिक आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारणात अगदी वेगवान घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. यातच शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट यांच्यातील संघर्षही आणखी तीव्र होताना दिसत आहेत. यातच आता आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) अधिक आक्रमक झाले असून, बंडखोर आमदारांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. यातच आता एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर जे काही सुरू आहे ते लोकशाहीविरोधी आहे, सध्या राज्यात सर्कस सुरू असल्याचे चित्र असल्याचा खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. 

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी १६ बंडखोर आमदारांना बजावलेल्या नोटिसीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवरील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने बंडखोर आमदारांना बाजू मांडण्यासाठी १२ जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. यानंतर प्रतिक्रिया देताना, ठाकरे सरकार बहुमत सिद्ध करू शकेल का, या प्रश्नावर बोलताना, आम्हीच जिंकू. एकनाथ शिंदे यांचे बंड आणि त्यानंतरच्या घडामोडी लोकशाहीविरोधात आहे. आता राज्यात सर्कस सुरू असल्याचे चित्र आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. 

उद्धव ठाकरे यांना लोकसेवेचा ध्यास

राज्यात एकाबाजूला राजकीय नाट्याचा दुसरा अंक सुरू झाला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तर, उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांकडील खाती काढून अन्य मंत्र्यांकडे कामकाज सोपवले आहे. यावर बोलताना, उद्धव ठाकरे यांच्या मनात केवळ लोकसेवेचा विचार आहे. बंडखोरांना गुवाहाटीला पळून जायची गरज नव्हती. बंडखोरांपैकी १५ ते १६ जण आमच्या संपर्कात आहेत. मुंबईत आले की, ते आमच्यासोबत असतील. त्यांना शिवसेनेतच राहायचे आहे. तसे न केल्यास ते अपात्र ठरू शकतात, हे त्यांना माहिती आहे किंवा मग भाजपमध्ये जाण्यापासून त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसेल. मात्र, अजूनही जे येऊ इच्छितात, त्यांच्यासाठी शिवसेनेचे दरवाजे आजही खुले आहेत, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. 

दरम्यान, प्रत्येक आमदाराचे मान पकडून, हात पकडून कैद्यासारखे सुरत ते गुवाहाटी फरपटत नेले, असे व्हिडिओ आहेत. यांच्यासाठी काय कमी केले? त्यांना स्वतःला आरशात बघायलाही लाज वाटेल, अशी त्यांची परिस्थिती झाली आहे. अतिशय साधे संजय पवार यांना पाडायचं काम फुटीरतावादी आमदारांनी केले. तुम्ही जास्त विश्वास टाकला असे म्हणतात तेव्हा उद्धवजी म्हणतात शिवसैनिकवर विश्वास नाही टाकायचा तर कोणावर टाकायचा. पहिले बंड सत्ताधारी पक्षातून विरोधी पक्षात जात आहेत. प्रत्येक आमदार तिथे गेला तरी विजय शिवसेनेचाच होणार, असा इशारा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी दिला आहे. 
 

Web Title: aaditya thackeray reaction after supreme court decision about shiv sena rebel eknath shinde group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.