Join us  

सत्तास्थापनेवरून रस्सीखेच सुरू असतानाच शिवसेनेचे आमदार राज्यपालांच्या भेटीला!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 3:12 PM

भाजपा आणि शिवसेना यांच्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटला नाही.

मुंबई : भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसपाठोपाठ शिवसेनेनेही आपल्या विधीमंडळ गेटनेतेपदाची निवड केली आहे. शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच, सुनील प्रभू यांची विधानसभेतील शिवसेनेचे पक्ष प्रतोदपदी निवड करण्यात आली आहे. 

नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे यांनी पक्षाच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव बैठकीत मांडला. हा प्रस्ताव बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला. या बैठकीनंतर शिवसेनेचे आमदार राज्यपालांची भेट घेणार आहेत. याबाबतची माहिती संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ते म्हणाले, 'शिवसेनेचे सर्व आमदार राज्यपालांची भेट घेणार आहेत. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी शिवसेनेचे आमदार राज्यपालांकडे मागणी करणार आहेत.'

दरम्यान, भाजपा आणि शिवसेना यांच्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटला नाही. सत्तेत महत्त्वाचा वाटा मिळावा, यासाठी रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना मुख्यमंत्रिपदासाठी आक्रमक झालेली असून, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सत्तेच्या वाटपावरून भाजपावर सतत निशाणा साधत आहेत. सत्तेच्या पदांचे समसमान वाटप व्हावे. जे हक्काचे आहे, न्यायाचे आहे, असे संजय राऊत यांनी याआधीही म्हटले आहे. याचबरोबर, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी भाजपा आणि शिवसेनेत चढाओढ सुरू आहे. यावरून संजय राऊत यांनी भाजपावर दबाव आणण्यासाठी कोणत्याही आमदाराचे नाव घ्या, सगळे आमच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे.  

टॅग्स :शिवसेनाआदित्य ठाकरेउद्धव ठाकरेसंजय राऊतभाजपाएकनाथ शिंदेमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019